लंडन: पोर्टकलिस लिगल्स या ब्रिटनमधील कायदेविषयक सेवा देणाऱ्या कंपनीनं कर्मचाऱ्यांसाठी नवं धोरण आणलं आहे. पोर्टकलिस लिगल्समधील कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातील केवळ चार दिवस काम करावं लागेल. त्यामुळे त्यांना तीन दिवस सुट्टी मिळेल. विशेष म्हणजे कामाचे दिवस कमी करताना कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. याशिवाय कामाचे तासदेखील वाढवण्यात आलेले नाहीत. यामुळे कर्मचारी अतिशय आनंदात आहेत. सध्या सर्वत्र पगारवाढीची चर्चा सुरू आहे. देशातील अनेक कंपन्यांमध्ये यासाठी हालचालीदेखील सुरू आहेत. या अप्रायजलच्या कालावधीत पोर्टकलिस लिगल्स कंपनीच्या निर्णयानं अनेकांना धक्का दिला आहे. तर चार दिवसांचा आठवडा सुरू झाल्यानं पोर्टकलिस लिगल्सच्या कर्मचाऱ्यांना सुखद धक्का मिळाला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती कंपनीतील विविध विभागांच्या प्रमुखांनी दिली. आठवड्यातून केवळ चारच दिवस काम करायचं असल्यानं कर्मचारी अधिक जबाबदारीनं आणि झोकून देऊन काम करू लागले आहेत. चार दिवसांचा आठवडा करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कामाचा दर्जा उंचावल्याचं पोर्टकलिस लिगल्सचे व्यवस्थापकीय संचालक ट्रेवोर वर्थ यांनी सांगितलं. 'चार दिवसांचा आठवडा सुरू झाल्यापासून कर्मचारी अतिशय उत्साहात आहेत. त्यामुळे त्यांचा कामाचा उरक आणि झपाटा वाढला आहे. कर्मचारी आनंदात असल्यानं ग्राहकांना चांगली सेवा मिळत आहे,' असं वर्थ म्हणाले. पोर्टकलिस लिगल्सनं गेले पाच महिने चार दिवसांच्या आठवड्याची संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर राबवली होती. त्यात यश आल्यानं हेच धोरण कायम ठेवण्यात आलं.
चार दिवसांचा आठवडा अन् घसघशीत पगारवाढ; 'या' कंपनीच्या सोयी वाचून व्हाल गार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 5:44 PM