न्यायालयाचा आदेश : अँपलला मिळणार १२ कोटी डॉलरची नुकसान भरपाईकॅलिफोर्निया : अमेरिकेच्या एका न्यायालयाने अमेरिकी कंपनी अँपलच्या दोन पेटंट नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोरियन कंपनी सॅमसंगला १२ कोटी डॉलरची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अँपलने दावा केलेल्या नुकसान भरपाईहून ही रक्कम खूप कमी तर आहेच शिवाय न्यायालयाने सॅमसंगच्या पेटंटचे उल्लंघन केल्याबद्दल अँपललाही दीड लाख डॉलरच्या भरपाईचे आदेश दिले आहेत. कॅलिफोर्नियाच्या एका ज्युरीने शुक्रवारी सॅन जोसे येथील संघीय न्यायालयात दोन्ही कंपन्यांच्या ताज्या वादावर निर्णय सुनावला. कित्येक महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. स्मार्टफोन फिचरचे पेटंट चोरल्याचा आरोप अँपलने सॅमसंगवर केला होता. तर सॅमसंगने आरोप फेटाळून लावत अँपलने आपल्या पेटंट नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. ताज्या खटल्यात अँपलने पाच पेटंटचे उल्लंघन केल्याप्रकरणी सॅमसंगकडून २.२ अब्ज डॉलरची मागणी केली होती. या पेटंटमध्ये ‘स्लाईड टू अनलॉक’ या फंक्शनचाही समावेश आहे. मागील काही वर्षांपासून अँपल व सॅमसंगदरम्यान अनेक देशांमध्ये पेटंट कायद्याबाबत लढाई सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी एका ज्युरीने सॅमसंगला अँपलचे तंत्रज्ञान वापरल्यामुळे ९३ कोटी डॉलर भरणा करण्याचे आदेश दिले होते. हा निर्णय जागतिक पातळीवर प्रमुख दोन स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांतील बौद्धिक संपदा कायद्यासंबंधीच्या लढय़ाशी संबंधित आहे. (वृत्तसंस्था)
सॅमसंगला पेटंट चौर्य भोवले
By admin | Published: May 05, 2014 3:07 PM