ऑनलाइन लोकमत
लॉस अँजेलिस दि. 13 - गायक आणि सितारवादक अनुष्का शंकर यांची सहाव्यांदा ग्रॅमी पुरस्काराची संधी हुकली. पण त्याचवेळी तबला वादक संदीप दास यांच्या रुपाने भारतीय संगीताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला. यो यो मा यांच्यासोबतच्या 'सिंग मी होम' या अल्बमासाठी संदीप दास यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला. अनुष्का शंकरला लँड ऑफ गोल्ड अल्बमसाठी नामांकन मिळाले होते.
दास यांचा 'सिंग मी होम' जागतिक संगीत गटात सर्वोत्कृष्ट अल्बम ठरला. भारतीय आणि पाश्चात्य संगीतच्या जुगलबंदीवर आधारीत हा अल्बम आहे. यो यो मा आणि संदीप दास 'द सिल्क रोड' या म्युझिक ग्रुपमध्येही एकत्र काम करतात. द सिल्क रोड मध्ये जगातल्या वेगवेगळया देशातील कलावंत सहभागी आहेत.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रवेशबंदीच्या आदेशाचा संदर्भ देत संदीप दास म्हणाले की, जेव्हा असे निर्णय होतात तेव्हा त्यांचा आमच्यावर परिणाम होतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जास्तीत जास्त संगीताचे कार्यक्रम करुन प्रेम निर्माण केले पाहिजे असे ते म्हणाले.
संदीप दास यांनी किशन महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तबलावादनाचे प्रशिक्षण घेतले आहे. 2000 साली सिल्क रोडची स्थापना झाल्यापासून ते त्यांच्यासोबत कार्यक्रम करत आहेत. ग्रॅमी पुरस्कारात नामांकन मिळण्याचे त्यांचे हे तिसरे वर्ष होते. याआधी 2009 आणि 2005 मध्ये त्यांना नामांकन मिळाले होते.
झाकीर हुसेन
संदीप दास यांच्याआधी प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना दोन वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. 1992 आणि 2009 असा दोनवेळा त्यांनी ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरले.
ग्रॅमी पुरस्काराची सुरुवात
संगीत क्षेत्रातील योगदानासाठी विशेषकरुन इंग्रजी संगीतातील योगदानासाठी ग्रॅमी पुरस्कार दिला जातो. 4 मे 1959 रोजी पहिली ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार पडला. त्यावेळी एकच पुरस्कार सोहळा दोन ठिकाणी पार पडला. कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्कच्या पार्क शेरेटॉन हॉटेलमध्ये ग्रॅमी पुरस्काराचे वितरण झाले. काळानुरुप ग्रॅमी पुरस्काराच्या संख्येमध्ये आणि कॅटेगरीमध्ये वाढ होत आहे. संगीत क्षेत्रात ग्रॅमी पुरस्काराला ऑस्कर पुरस्काराइतके महत्व आहे.