ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 15 - शाळेत जाणा-या आपल्या मुलाने उगाच बाहेरचं उघड्यावरचं खाऊन आजारी पडू नये म्हणून रोज प्रत्येक आई सकाळी उठून डबा तयार करत असते. आपल्या मुलाला पौष्टिक अन्न मिळावं यासाठी हा सगळा खटाटोप सुरु असतो. पण समजा तुमच्या मुलाने शाळेत जेवणाचा डबा नेला म्हणून त्याच्यावर कर लावला तर ? असं कसं काय शक्य असेल म्हणत असाल तर थांबा....अशी घटना घडली आहे. शहरातील सर्व शाळा घरुन जेवणाचा डबा आणणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून "सँडव्हिच टॅक्स" वसूल करत आहेत.
डेलीमेलमध्ये आलेल्या वृत्तानुसार, "सँडव्हिच टॅक्स" म्हणून पालकांकडून दिवसाला 2 पाऊंड वसूल केले जात आहेत. ही रक्कम डायनिंग हॉलची साफसफाई करण्यावर खर्च करण्यात येत आहे. हा आपल्यावर पडत असलेला आर्थिक भार असून कठीण वेळ असल्याची प्रतिक्रिया काही जणांनी दिली आहे.
एनएएसयुडब्ल्यूटी युनिअनने पालकांकडून वसूल केले जात असलेल्या या पैशांचा हिशेब मागितला आहे. 2211 पैकी 26 पालकांनी आपल्या मुलांनी जेवणाचा डबा नेल्याने दंड भरायला लागल्याचं कबूल केलं आहे.
"आम्ही शाळेतील जेवणाचा खर्च उचलू शकत नाही म्हणूनच त्यांना डबा देऊन पाठवतो", असं पालकांचं म्हणणं आहे. अशाप्रकारे शाळेत जेवणावरुन दंड आकारणी आणि वसूली करणे चुकीचं असून कोणत्याही परिस्थितीत स्विकारलं जाऊ शकत नाही असं शिक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे. तसंच त्यांनी शाळा प्रशासनानकडे या प्रकाराची तक्रार करत थांबवलं पाहिजे असंही म्हटलं आहे.