न्यूजर्सी : भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्यातनाम गायक व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित असलेले पंडित जसराज यांचे अमेरिकेतील न्यूजर्सी शहरामध्ये सोमवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडेपाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ९० वर्षे वयाचे होते. मेवाती घराण्याचे गायक असलेल्या पं. जसराज यांनी आठ दशके संगीतसेवा केली. त्यांच्या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना संगीत मार्तंड असेही संबोधले जात असे.त्यांच्या मागे पत्नी मधुरा जसराज व मुलगी दुर्गा असा परिवार आहे.शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सुमारे आठ दशके त्यांनी आपल्या गायकीने सर्वांना आनंद दिला. त्यांनी मोठा शिष्यपरिवार घडविला. कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला त्यावेळेस पं. जसराज हे अमेरिकेत होते. त्यामुळे त्यांनी आणखी काही महिने अमेरिकेतच राहण्याचा निर्णय घेतला होता. पं. जसराज यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही पं. जसराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.>आकाशातील ग्रहाला नावगेल्या वर्षी पद्मविभूषण पंडित जसराज यांचे नाव मंगळ व गुरू या दोन ग्रहांमधील व्हीपी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ग्रहाला देण्यात आले. असा सन्मान मिळालेले पं. जसराज एकमेव भारतीय संगीत कलाकार आहेत.पं. जसराज यांचे शिष्य : पंडित प्रसाद दुसाने, पंडित संजीव अभ्यंकर, तृप्ती मुखर्जी, पं. रतनमोहन शर्मा, अंकिता जोशी, श्वेता जव्हेरी आदींचा समावेश.>पंडित जसराज यांच्या निधनामुळे भारताच्या सांस्कृतिक विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. ते केवळ उत्तम शास्त्रीय गायकच नव्हते तर उत्तम गुरुही होते. त्यांनी अनेक गुणी शिष्य घडविले.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
स्वरसूर्य मावळला! संगीतमार्तंड पं. जसराज यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 5:47 AM