पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टा येथील सरदार हाजी जान मोहम्मद (५०) यांच्या पत्नीने रविवारी, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अजून एका अपत्याला जन्म दिला. यासोबतच त्यांच्या अपत्यांची एकूण संख्या ६० झाली. त्यांना ६० मुले तीन बायकांपासून झाली, त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला तर, ५५ मुले जिवंत आणि निरोगी आहेत. नववर्षाच्या दिवशीच घरी अजून एका मुलाचा जन्म झाल्याबद्दल खूप आनंदी असल्याचे ते म्हणाले.
क्वेटातील ईस्टर्न बायपासजवळ ते राहतात आणि त्याच परिसरात त्यांचे क्लिनिकदेखील आहे. रविवारी जन्मलेल्या मुलाचे नाव खुशहाल खान असे ठेवले आहे. विशेष म्हणजे जान मोहम्मद यांच्या तीन बायका आणि सर्व मुले एकाच घरात राहतात. इतकी मुले जन्मल्यावरही थांबण्याचा त्यांचा विचार नाही. जर अल्लाहची इच्छा असेल तर आणखी मुले होतील, असे ते म्हणाले. यासाठी ते चौथ्यांदा लग्न करण्याचाही विचार करत असून योग्य स्त्रीच्या शोधात आहेत.
इतक्या मुलांची नावे आठवतात का, असे विचारल्यावर मोठ्याने हसत...का नाही?, असे म्हणतात. त्यांच्या काही मुला-मुलींचे वय २० वर्षांपेक्षा जास्त आहे, परंतु शिक्षण सुरु असल्याने एकाचेही अद्याप लग्न झालेले नाही. दरम्यान, काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत १०० मुले जन्माला घालण्याचे ध्येय असल्याचे ते म्हणाले होते, त्यामुळे जान यांच्याबाबत सध्या पाकिस्तानच्या सोशल मीडियात प्रचंड चर्चा आहे.