नवी दिल्ली - अमेरिकेने मागील काही दिवसांच्या आडमुठ्या भूमिकेनंतर आता कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांचे अमेरिकन समकक्ष जॅक सुलविन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अमेरिकेनं लसीकरणासाठी लागणारा कच्चा माल पुरवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयाचे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे प्रमुख सत्या नंडेला यांनी स्वागत केले आहे. तसेच, भारतातील कोरोनाची विदारक परिस्थिती पाहून अतियश वेदना होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली असून रुग्णसंख्या दररोज लाखोंच्या पुढे जात आहे. शनिवारी जगातील इतर देशांपेक्षा भारतात सर्वाधिक नवे रुग्ण सापडले. या दिवशी कोरोनामुळे २६२४ जणांचा मृत्यू झाला तसेच २ लाख १९ हजार रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची वाढत चाललेली संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडलेला ताण पाहून शेजारील राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त होत आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) याच्यानंतर माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही मदतीचा हात पुढे केला आहे. आता, मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नंडेला यांनीही आपलं दु:ख व्यक्त करत मदतीचा हात दिला आहे.
शोएब अख्तर काय म्हणाला?''कोणत्याही सरकारला या संकटाचा सामना करणं जवळपास अशक्यच आहे. मी माझ्या सरकारला आणि चाहत्यांना आवाहन करतो की भारताला मदत करा. भारताला सध्या ऑक्सिजन टँकची गरज आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी भारताला निधी मिळवून देण्यासाठी दान करा आणि ऑक्सिजन टँक्स त्यांच्यापर्यंत पोहोचवा,''असे आवाहन शोएबनं यूट्यूबवरून केलं आहे.