रियाध- सौदी अरेबियाने एक नवा निर्णय घेऊन केवळ आपल्याच नागरिकांना नव्हे तर जगभरातील लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सौदी सरकारने चित्रपटांवर गेली 35 वर्षे घातलेली बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात येते. तसेच राजपुत्र मोहम्मद यांच्या प्रयत्नांमुळेच महिलांना गाडी चालविण्याची परवानगी देण्यात आली होती. काही दिवसांपुर्वी हिबा तावाजी या लेबनिज गायिकेच्या मैफिलीची कार्यक्रमही सौदी अरेबियामध्ये झाला. गेल्या अनेक दशकांच्या बंदीच्या काळानंतर अशा नव्या बदलाचे वारे सौदी अरेबियामध्ये वाहू लागले आहे.या निर्णयानंतर सौदीमधील पहिल्या चित्रपटगृहाचे दार मार्च 2018 मध्ये प्रेक्षकांसाठी उघडले जाईल. 2030पर्यंत देशामध्ये 300 चित्रपटगृहे सुरु होतील असा अंदाज सौदी सरकारने व्यक्त केला आहे. या प्रकल्पातून 90 अब्ज रियाल म्हणजेच 24 अब्ज डॉलर्स महसूल सरकारला मिळेल आणि 30 हजार नोकऱ्या उपलब्ध होतील असाही सरकारला विश्वास वाटतो.संगिताच्या मौफिलींना परवानगी मिळाल्यानंतर जगभरातील संगीत क्षेत्रातील कलाकारांनी सौदीकडे धाव गेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या मैफिलींना सौदीचे नागरिक जोरदार प्रतिसाद देत आहेत. त्याचप्रमाणे यामधून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होत आहे. पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्यासाठी सौदी अरेबियाने अशा नव्या मार्गांचा वापर सुरु केला आहे. राजपुत्र मोहम्मद हे 32 वर्षांचे असून राजे सलमान यांचे ते पुत्र आहेत. आर्थिक आणि राजकीय निर्णयांबरोबरच सांस्कृतीक क्षेत्रामध्ये बदल घडवण्याचे संकेत त्यांच्या निर्णयांमधून मिळत आहेत.
योगासनांचाही स्वीकारकट्टर इस्लामिक देश असलेल्या सौदी अरेबियाने योगासनांचाचा स्वीकार करताना योग ला खेळाचा दर्जा दिला आहे. सौदी प्रशासनाकडून तसी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या ट्रेड अँड इंडस्ट्रीने क्रीडाप्रकार म्हणून योगासने शिकवण्याला अधिकृत परवानगी दिली आहे. त्यामुळे सौदी अरेबियामध्ये अधिकृत परवाना घेऊन योग शिकवता येणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे नोफ मारवाई या महिलेला सौदी अरेबियामधील पहिली योग प्रशिक्षक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सौदी अरेबियामध्ये योगला खेळ म्हणून मान्यता मिळवून देण्याचे श्रेय नोफ यांनाच जाते. नोफ यांनी योगला खेळाचा दर्जा मिळावा म्हणून दीर्घकाळापासून अभियान राबवले होते.