सौदी अरेबिया सरकारने भारतीयांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता भारतीय नागरिकांना सौदी अरेबियाला जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करताना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटची गरज भासणार नाही. नवी दिल्लीतील सौदी अरेबियाच्या दूतावासानुसार, सौदी अरेबियाला भेट देण्यासाठी व्हिसा मिळवताना कोणत्याही व्यक्तीला पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक नाही.
सौदी अरेबियाच्या दूतावासाने यासंदर्भात एक ट्विट करून माहिती दिली आहे. सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील मजबूत संबंध आणि धोरणात्मक भागीदारी लक्षात घेऊन ज्भारतीय नागरिकांना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) सादर करण्यापासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यात नमूद करण्यात आलेय. त्याच वेळी, निवेदनात, सौदी अरेबियामध्ये शांततामय वातावरणात वास्तव्यास असलेल्या 20 लाखांहून अधिक भारतीय नागरिकांच्या योगदानाचेही दूतावासाने कौतुक केले आहे.
भारताकडूनही प्रतिक्रियासौदी अरेबिया सरकारच्या या निर्णयाचे भारत सरकारने स्वागत केले आहे. सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने या निर्णयाबद्दल सौदी सरकारचे आभार मानले आहेत. सौदी अरेबिया सरकारच्या या निर्णयामुळे त्या ठिकाणी राहणार्या 20 लाखांहून अधिक भारतीय लोकांना दिलासा मिळणार असल्याचे भारताकडून सांगण्यात आले.
भारतीयांना दिलासावास्तविक, कोणत्याही देशाचा व्हिसा मिळणे हे सोपे काम नाही. त्यासाठी अनेक प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर तपास केला जातो आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्हिसा दिला जातो. अशा परिस्थितीत पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट हाही याच प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यामुळे लोकांचा वेळही वाया जातो. मात्र कडक नियमांमुळे ते जमा करावे लागते. मात्र, आता सौदी सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.