Saudi Arabia on Israel Hamas War : सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांनी इस्रायलविरुद्ध कठोर पाऊल उचलण्याची मागणी केली आहे. मंगळवारी एक आभासी ब्रिक्स शिखर परिषद पार पडली. या दरम्यान, क्राउन प्रिन्सने बोलताना सर्व देशांना इस्रायलला शस्त्रास्त्रांची निर्यात थांबवण्याचे आवाहन केले. ब्रिक्सची आभासी बैठक दक्षिण आफ्रिकेने आयोजित केली होती. या बैठकीत चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीनही उपस्थित होते. इस्रायल-हमास संघर्षावर सर्वसमंतीने एक मत तयार करणे हा या बैठकीचा उद्देश आहे.
प्रिन्सने सांगितले की, सौदी अरेबियाने १९६७ च्या सीमांच्या आधारे पॅलेस्टाईनची स्थापना करण्याची मागणी केली आहे. गंभीर आणि व्यापक शांतता प्रक्रियेसाठी हे आवश्यक आहे. ते म्हणाले, 'सौदी अरेबियाची स्थिती स्थिर आणि ठाम आहे. पॅलेस्टाईनमध्ये आंतरराष्ट्रीय निर्णयांची अंमलबजावणी करण्याशिवाय सुरक्षा आणि स्थिरता प्राप्त करण्याचा कोणताही मार्ग नाही. याशिवाय त्यांनी गाझावरील हल्ल्यांवर टीका करत ते थांबवण्याची मागणी केली.
गाझामध्ये होणारे हल्ले आपण एकत्रितपणे थांबवू शकतो. याशिवाय, सौदीच्या प्रिन्सने गाझा पट्टीतून पॅलेस्टिनींना जबरदस्तीने विस्थापित केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि येथील परिस्थिती सुधारण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ऑक्टोबर २०१५ मध्ये हमासने इस्रायलवर अचानक हल्ला केला. यानंतर इस्रायलने गाझावर हल्ले करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अनेक दिवस इस्रायलकडून बॉम्बचा वर्षाव होत होता. आता इस्रायली सैन्याने उत्तर गाझाचा बहुतांश भाग ताब्यात घेतला आहे. अहवालानुसार, गाझामध्ये 13,000 हून अधिक लोक मरण पावले.