जगभरात पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किंमतींनी महागाई वाढविली आहे. यामुळे अनेक देशांनी कर कपात करण्यावर भर दिलेला असला तरी सौदी अरेबियाच्या एका निर्णयाने या देशांची झोप उडाली आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली होती. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अमेरिकेने सौदी अरेबियासह ओपेक देशांना कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्यास सांगितले होते. तेव्हा सौदीने यास होकारही दिला होता. परंतू, आज अचानक नकार दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वीच सौदीने रशियाला ओपेक प्लस देशांच्या संघटनेतून बाहेर काढण्यास नकार दिला होता. हा धक्का अमेरिकेला बसत नाही तोच सौदीने आणखी एक निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी आम्ही काहीही करणार नाही, तेलाचे उत्पादन वाढविणार नाही, असे म्हटले आहे.
सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिंस फैसल बिन फरहान यांनी ही घोषणा केली आहे. कच्च्या तेलाचा तुटवडा नाही, यामुळे कशासाठी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवावे, असा सवाल केला आहे. दावोसमध्ये सुरु असलेल्या संमेलनात बिझनेस इनसायडरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आम्ही जे काही करू शकत होते, ते आम्ही केले आहे. यामुळे कारण नसताना कच्च्या तेलाचे उत्पादन आम्ही वाढविणार नाही, असे ते म्हणाले.
इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) च्या मते, सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा निर्यातदार आहे. आयईएने मार्चमध्ये इंधनाच्या वाढत्या किंमतींवर अंकुश ठेवण्यासाठी कच्च्या तेलाचे अतिरिक्त उत्पादन करण्यासाठी १० सूत्रीय योजना बनविली होती. परंतू, त्यास सौदीने केराची टोपली दाखविली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या वर्षीच्या तुलनेत ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत. ११० डॉलरवरून रशिया-युक्रेन युद्धानंतर थेट २० टक्क्यांची वाढ झाली आहे.