रियाद : सौदी अरेबियाने पहिल्यांदाच टुरिस्ट व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यासोबत पर्यटकांवर काही बंधनं घालण्यात आली आहेत. सौदीतील जीवनशैली आणि कार्यपद्धतीला अनुसरुन पर्यटकांना काही अटी घातल्या आहेत.
सौदी अरेबियाच्या टुरिस्ट व्हिसा अटीनुसार, जर तोकडे कपडे परिधान करून किंवा सार्वजनिक ठिकाणी किस करताना पर्यटक आढळल्यास दंड द्यावा लागणार आहे. तसेच, या नियमानुसार 19 अॅक्टिव्हिटीज् गुन्हाच्या श्रेणीत सामील करण्यात आल्या आहेत. यात दारु पिणे सुद्धा आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, टूरिस्ट व्हिसासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाइटवर यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. या गुन्हांमध्ये कचरा करणे, थुंकणे, लाइन तोडणे, परवानगीशिवाय लोकांचे फोटो किंवा व्हिडिओ शूट करणे, नमाज अदा करताना गाणी लावणे आदींचा समावेश आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास 50 रियाल (सौदी करंसी) ते 6 हजार रियाल पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सौदी अरेबियाने 49 देशांसाठी टुरिस्ट व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे.