रियाध :सौदी अरेबियापाकिस्तानातून आलेल्या भिकाऱ्यांमुळे बेजार झाला आहे. तीर्थयात्रेचा व्हिसा घेऊन येणाऱ्या व भीक मागणाऱ्या या लोकांना आवर घाला, असे सौदी अरेबियानेपाकिस्तानला बजावले आहे.
पाकिस्तानने वेळीच पावले न उचलल्यास त्याचा त्या देशाच्या हज यात्रेकरूंना परवानगी देण्यावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा सौदीने दिला आहे. तीर्थयात्रेच्या निमित्ताने पाकचे लोक आखाती देशांचा दौरा करतात. ते सौदी अरेबिया अथवा यूएईमध्ये राहतात व त्यातील काही लोक तिथे भीक मागतात. या समस्येवर तोडगा म्हणून पाक कायदा करण्याच्या विचारात आहे.
माफियांवर कारवाई...
याच मुद्द्यावरून गेल्या मंगळवारी पाकिस्तानातील सौदी अरेबियाचे राजदूत नवाफ बिन सैद अहमद अल-मलिकी व पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्यात चर्चा झाली होती.
सौदीत भीक मागण्यासाठी लोकांना पाठविणाऱ्या पाकच्या माफियांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन नक्वी यांनी या चर्चेत दिले.
तिथे चोऱ्या करणाऱ्यातही..
सौदीमध्ये तीर्थयात्रा व्हिसावर जाणाऱ्या व तिथे भीक मागण्याचा हेतू असलेल्या ११ जणांना गेल्या महिन्यात कराची विमानतळावर पकडण्यात आले होते.
पाकिस्तानातून येऊन लोक आमच्या देशात भीक मागतात, चोऱ्या करतात अशी तक्रार सौदी अरेबियाने गेल्या वर्षीही केली होती.
अटक होणाऱ्यांत ९०% पाकिस्तानी भिकारी
जगभरात विविध प्रकरणांत अटक होणाऱ्या भिकाऱ्यांमध्ये ९० टक्के प्रमाण पाकिस्तानी भिकाऱ्यांचे असते, असे वृत्त पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्रानेच प्रसिद्ध केले होते.
पाकिस्तानी भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येने यूएई हा देशही बेजार आहे. ज्यांच्या बँकेत पुरेसे पैसे नाहीत, अशा पाकिस्तानी नागरिकांनी यूएई व्हिसा देण्यास टाळाटाळ करते.
यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात दुबईमध्ये पाकिस्तानी भिकाऱ्यांविरोधात मोहीम राबविण्यात आली होती. त्यात २०० जणांना अटक केली होती. त्यात निम्मे प्रमाण महिलांचे होते.