रियाद - सौदी अरेबियाने टुरिस्ट व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यासोबत पर्यटकांवर काही बंधनं घालण्यात आली आहेत. सौदीतील जीवनशैली आणि कार्यपद्धतीला अनुसरुन पर्यटकांना काही अटी घातल्या आहेत. मात्र आता काही नियम शिथिल करण्यात येत आहेत. अविवाहित परदेशी जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच एकट्या महिलांना ही हॉटेलमध्ये रुम बुक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सौदी अरेबिया सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
सौदी अरेबियात असलेल्या नियमांमध्ये परदेशी जोडप्यांना हॉटेलमध्ये एकाच रुममध्ये राहण्यासाठी ते विवाहित असल्याचा पुरावा द्यावा लागत असे. मात्र आता असा नियम असणार नाही. अविवाहित परदेशी जोडप्यांना आता हॉटेलमध्ये एकाच रुममध्ये राहण्याची परवानगी येथील सरकारने दिली आहे. तसेच एकट्या महिलांना ही हॉटेलमध्ये रुम बुक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार नसलेला जगातील एकमेव सौदी अरेबिया देश होता. मात्र त्यानंतर देशात महिलांना वाहन चालविण्याचा परवानगी देण्यात आली. या निर्णयानंतर आता एकट्या महिलांना हॉटेलमध्ये रुम बुक करता येणार आहे. पर्यटन विभागाने रविवारी याबाबत माहिती दिली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सौदीचे किंग सलमान यांनी फर्मान काढून महिलांना वाहन चालविण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे हा निर्णय महिलांसाठी महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरला होता. सौदीत महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेग-वेगळे कायदे आहेत. यामध्ये महिलांना वाहन चालवण्याची परवानगी दिली नव्हती. मात्र, किंग सलमान यांनी घेतल्याने निर्णयाचे जगभरातून स्वागत करण्यात आले होते. अमेरिकेनेही या निर्णयाचे स्वागत केले होते. सौदीतील महिलांना गाडी चालविण्यास परवानगी दिल्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा निर्णय देशाला योग्य दिशेला घेऊन जाणारा आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका प्रवक्त्याने म्हटले होते.
सौदी अरेबियाच्या टुरिस्ट व्हिसा अटीनुसार, जर तोकडे कपडे परिधान करून किंवा सार्वजनिक ठिकाणी किस करताना पर्यटक आढळल्यास दंड द्यावा लागणार आहे. तसेच, या नियमानुसार 19 अॅक्टिव्हिटीज् गुन्हाच्या श्रेणीत सामील करण्यात आल्या आहेत. यात दारु पिणे सुद्धा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टूरिस्ट व्हिसासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाइटवर यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. या गुन्हांमध्ये कचरा करणे, थुंकणे, लाइन तोडणे, परवानगीशिवाय लोकांचे फोटो किंवा व्हिडिओ शूट करणे, नमाज अदा करताना गाणी लावणे आदींचा समावेश आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास 50 रियाल (सौदी करंसी) ते 6 हजार रियाल पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सौदी अरेबियाने 49 देशांसाठी टुरिस्ट व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे.