ईराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता आहे. इस्त्राय़लच्या हवाई हल्ल्यात ईराणी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आणि ईराणने इस्त्रायलवर हवाई हल्ले केले. परंतु ही क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. जवळपास ९० टक्के हल्ला आम्ही नष्ट केला असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे या हल्ल्याचे जास्त नुकसान झेलावे लागले नाही. हे इस्त्रायलला सौदी अरेबिया आणि युएईने ईराणचे गुपित फोडल्याने शक्य झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
द वॉल स्ट्रीक जर्नलच्या वृत्तानुसार इस्त्रायल आधीपासूनच ईराणच्या हल्ल्यांसाठी तयार झाला होता. कारण अरब देशांनी गुपचूप तेहरानच्या हल्ल्यांचा प्लॅनबाबत गुप्त बातमी दिली होती. द वॉल स्ट्रीट जर्नलने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. अरब देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र लढाऊ विमानांसाठी खोलले आणि रडारची माहिती देण्याबरोबरच काही वेळा त्यांच्या सैन्याच्या सेवाही वापरण्यास दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
ईराण हल्ला करणार हे निश्चित झाल्यानंतर लगेचच अमेरिकेने अरब देशांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. तेहरानच्या प्लॅनबाबत गुप्त माहिती देणे आणि इस्त्रायलकडे रोखलेली मिसाईल, ड्रोनची तैनाती सांगणे आदी माहिती देण्यास या देशांना भाग पाडले.
काही अरब राष्ट्रांनी इस्त्रायलला मदत केल्यास आम्ही थेट युद्धात ओढले जाऊ अशी भीती व्यक्त केली होती. कारण ईराण याचा बदला घेईल असे वाटत होते. परंतु अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर युएई आणि सौदी ही माहिती देण्यास तयार झाले. जॉर्डनने देखील अमेरिकेच्या लढाऊ विमानांना आपले हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी दिली. तसेच आपली विमाने देखील यासाठी वापरणार असल्याची हमी दिली.