गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष सुरु आहे.या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे मोठे विधान समोर आले आहे. गाझामधील इस्रायलकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांबाबत मोहम्मद बिन सलमान यांनी इस्रायलचा तीव्र निषेध केला आहे. तसेच, इस्रायलकडून होणाऱ्या कारवाईला मोहम्मद बिन सलमान यांनी नरसंहार म्हटले असून इस्रायलला इशाराही दिला आहे.
बीबीसीच्या वृत्तानुसार, इस्रायली हल्ल्यासंदर्भात मुस्लिम आणि अरब देशांच्या नेत्यांची रियाधमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी लेबनॉन आणि इराणवरील इस्रायलच्या हल्ल्यांवरही टीका केली. यादरम्यान मोहम्मद बिन सलमान यांनी कट्टर प्रतिस्पर्धी तेहरानशी संबंध सुधारण्याचे संकेत दिले. तसेच, इस्रायलला इशारा देतानाच त्यांनी इराणवर हल्ले करण्यात येऊ नये, असे सांगितले.
इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करासौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला इस्रायलला इराणवर हल्ला करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले. यासोबतच इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्यास सांगितले. दुसरीकडे, सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी गाझामधील युद्ध थांबविण्यात आंतरराष्ट्रीय समुदायाचे अपयश असल्याचे म्हटले आहे.तसेच, इस्रायलवर या प्रदेशात उपासमार निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.
इस्रायलने नरसंहाराचे आरोप फेटाळलेइस्रायलने सातत्याने नरसंहाराचे आरोप फेटाळून लावले आहेत आणि त्यांच्या लष्करी कारवाईचा उद्देश दहशतवादी गट हमासला लक्ष्य करणे आहे, असे म्हटले आहे. दरम्यान, बैठकीत नेत्यांनी गाझामधील संयुक्त राष्ट्रांचे कर्मचारी आणि सुविधांवर इस्रायलच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला.