ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. 21 - सौदी अरेबियात येत्या 1 जुलैपासून कुटुंब कर लागू होणार आहे. त्यामुळे तिथे नोकरीच्या निमित्ताने राहणारे भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवण्याची तयारीत आहेत. सौदी अरेबियात परदेशातून वास्तव्यास आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 100 रियालची डिपेंडट फी भरावी लागणार आहे. 100 रियाल म्हणजे सरासरी 1700 रुपये होतात. या करामुळे आर्थिक बोजा वाढणार असल्याने भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवण्यावर गांर्भीयाने विचार करत आहेत.
सौदी अरेबियात 41 लाख भारतीय वास्तव्यास आहेत. सौदी अरेबियात राहण्याचा खर्च परवडणार नसल्याने काही कुटुंबांनी हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतलाय असे मोहम्मद ताहिरने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. दामाम येथे राहणारा ताहिर पेशाने संगणक तज्ञ आहे. मागच्या चार महिन्यात अनेकांनी आपल्या कुटुंबाला माघारी पाठवून दिले आहे अशी माहिती स्थलांतरीताच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते भीम रेड्डी मंधा यांनी दिली.
ज्यांना महिन्याला 5 हजार रियाल म्हणजे 86 हजार रुपये वेतन आहे त्यांना सौदी अरेबियामध्ये कौटुंबिक व्हिसा मिळतो. नव्या नियमामुळे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहणा-या प्रत्येकाला महिन्याला 300 रियाल म्हणजे 5100 रुपये डिपेंडट फी भरावी लागेल. 2020 पर्यंत प्रत्येक व्यक्तीची डिपेंडटी फी 100 रियालने वाढत जाणार आहे. म्हणजे 2020 साली प्रत्येक व्यक्तीसाठी दर महिन्याला 400 रियाल सरासरी 6900 रुपये भरावे लागतील.
महत्वाचा म्हणजे ही फी अॅडव्हान्समध्ये भरावी लागणार आहे. पत्नी वर्षभर सौदीमध्ये राहणार असेल तर, 1200 रियाल अॅडव्हान्समध्ये भरावे लागतील. पत्नी आणि दोन मुले असणा-यांना वर्षाला 3600 रियाल म्हणजे 62 हजार रुपये भरावे लागतील. काही कंपन्या त्यांच्या कर्मचा-यांना डिपेंडट फी ची भरपाई देण्याचा विचार करत आहे. अनेकांकडे पर्याय नसल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबाला मायदेशी पाठवावे लागत आहे. तेलाच्या किंमती घसरल्यामुळे सौदी अरेबियाच्या उत्पनात घट झाली आहे. डिपेंडट फी उत्पन वाढविण्याचा एक भाग आहे.