रियाध- सौदी अरेबियाने कतारवर लादलेल्या निर्बंधांनंतर अनेक देशांनीही कतारविरोधात पावले उचलून कतारशी संबंध तोडले. कतार संपूर्ण द्वीपकल्पामध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहे असा सौदीचा आरोप आहे. आता कतार पूर्णतः पाण्याने वेढले जावे आणि भौगोलिकदृष्ट्याही एकाकी पडावे यासाठी सौदी प्रयत्न करत असल्याची माहिती मक्का या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे. सौदीचे हे प्रयत्न पूर्णत्वास गेले तर कतार हे बेट होईल आणि भूभागापासून वेगळे होईल.
कतारच्या तिन्ही बाजूंनी समुद्र आहे तर एका बाजूला सौदी अरेबियाशी ते भूसिमेने जोडले गेले आहे. कतार आणि सौदी यांच्यामध्ये केवळ 38 मैलांची भूसीमा आहे. सौदी अरेबिया या 38 मैलांचा एक कालवा खोदण्याच्या प्रयत्नात आहे असा दावा या वर्तमानपत्रातील वृत्तामध्ये केला आहे. सौदी अरेबियाने जर असा कालवा खोदला तर कतार देश पूर्णपणे एक बेट होऊन जाईल. कतारमध्ये सध्या 26 लाख लोक राहात आहेत. या कालव्यामुळे त्यांच्या जीवनमानावर परिणाम होऊ शकतो.
या संभाव्य कालव्यास साल्वा कालवा असे नाव देण्यात आले असून त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत असे मक्का वर्तमानपत्रातील वृत्तात म्हटले आहे. या कालव्याला सौदी सरकारची मान्यता मिळणे बाकी आहे असे दोन महिन्यांपुर्वी सब्क नावाच्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले होते.हा कालवा 650 फूट रुंद व 130 फूट खोल असेल. यामधून जहाजे प्रवास करु शकतील.कतारच्या सीमेपासून हा कालवा 0.6 मैल दूर असेल त्यामूळे सर्व प्रकल्प सौदीच्या भूमीवर पूर्णत्त्वास जाईल. त्यासाठी 2.8 अब्ज सौदी रियाल म्हणजे 74.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा खर्च येणार आहे. शत्रूराष्ट्रावर मानसिक दबाव आणण्यासाठी अशाप्रकारची खेळी सौदी अरेबिया करत असावा असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.