रियाध: कच्च्या तेलाच्या किंमतींवरून अमेरिका आणि सौदी अरब पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकेला धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. सौदीने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केली आहे. त्याचा बदला घेतल्यास अमेरिकेला आर्थिक नुकसान सोसावे लागेल, असा इशारा सलमान यांनी दिला आहे. सौदीने या महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या उत्पादनात १० लाख बॅरल्स प्रतिदिन एवढी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच इतर ओपेक सदस्य देशांनीही कपात जाहीर केली. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर भडकण्याची भीती आहे. युक्रेन युद्धानंतर उत्पादन घटविले युक्रेन युद्धामुळे जगभरात इंधनाच्या किंमती आकाशाला भिडल्या होत्या. त्याचवेळी सौदीने कच्च्या तेलाचे उत्पादन घटविले होते. त्याचा अमेरिकेला मोठा फटका बसला होता. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सौदीला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. (वृत्तसंस्था)
...म्हणून राजकुमार झाले बायडेन यांच्यावर नाराज
बायडेन प्रशासनाने सौदीविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, बायडेन यांच्या • धमकीमुळे सौदीचे राजकुमार नाराज झाले. अमेरिकेने विपरीत पाऊल उचलल्यास त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागेल, असा इशारा सलमान यांनी दिला. हा इशारा थेट अमेरिकेच्या एखाद्या अधिकाऱ्याला दिला की सलमान यांच्या हेरगिरीतून ही बाब समोर आली, हे स्पष्ट झाले नाही.
ही आहे अमेरिकेला भीती
चीनच्या मध्यस्थीनंतर नुकतेच इराण आणि सौदीमध्ये राजकीय संबंध प्रस्थापित झाले. सौदीची चीनसोबत जवळीक अमेरिकेला नको. सौदी चीनच्या जवळ गेल्यास आखाती देशांमध्ये आपली पकड कमकुवत होईल, अशी अमेरिकेला भीती आहे.
पेट्रोल आणि डिझेल महागले, या राज्याने वाढविला व्हॅट
लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड : पेट्रोल आणि डिझेलचे दर कधी कमी होतात, याकडे जनतेचे लक्ष लागलेले असतानाच पंजाबमधील नागरिकांना तेथील राज्य सरकारने झटका दिला आहे. पंजाब सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट एक रुपयाने वाढविला आहे. पेट्रोलवरील व्हॅट १०८ टक्के वाढविला आहे. त्यामुळे पेट्रोल ९२ पैसे प्रतिलिटर महाग झाले आहे. त्याचप्रमाणे डिझेलवरील व्हॅट १.१३ टक्के वाढविल्यामुळे ते ९० पैसे प्रतिलिटरने महागले आहे. त्यामुळे पंजाबमध्ये अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर ९९ रुपये तर, डिझेलचे दर ८९ रुपये प्रतिलिटरच्या जवळपास झाले.
- पेट्रोलवरील व्हॅटमध्ये १.०८% वाढ
- डिझेलवरील व्हॅटमध्ये १.१३% वाढ