रियाध- सौदी अरेबिया आता थोडा मोकळा होतोय, महिलांना वाहन चालवण्याचा अधिकार दिला जात आहे, चित्रपटगृहांना सुरुवात होत आहे म्हणजे आता इतर जगासारखा हा देश मोकळाढाकळा झाला असं तुम्हाला वाटेल. पण नाही सौदी अरेबियात असं स्वतंत्र जगण्याचं वारं अजून तरी लवकर वाहू लागेल असं दिसत नाही. एका सांगितिक मैफिलित गाणं पूर्ण झाल्यावर एका सौदी महिलेने गायकाला मिठी मारली. त्यानंतर तिच्या या "अपराधा" बद्दल तिला अटक करण्यात आली आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महिलांना यापुर्वी अनेक वर्षे मज्जाव करण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ही बंदी उठवली होती. तसेच महिलांसाठी मैफिली आणि फूटबॉल सामन्यांचेही आयोजन करण्यात आले. इतकेच नव्हे तर लेबनिज गायिका हिबा तावाजी हीची मैफिलही आयोजित करण्यात आली. त्यानंतर महिलांना कार चालवण्यास परवानगी देण्यात आली मात्र असे सगळे असले तरी सौदी आपल्या जुनाट सार्वजनिक संकेत-नियमांमधून बाहेर आलेला नाही.