ठळक मुद्देसौदीत महिलांना वाहन चालविण्यास परवानगी किंग सलमान यांनी काढले फर्मानमहिलांसाठी महत्वपूर्ण निर्णय
रियाध - सौदी अरेबियातील महिलांना वाहन चालविण्यास परवानगी देण्यात आल्याचे वृत्त येथील मीडियाने दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौदीचे किंग सलमान यांनी फर्मान काढले असून त्यांनी महिलांना वाहन चालविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हा निर्णय महिलांसाठी महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरणार आहे. आतापर्यंत सौदीत महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेग-वेगळे कायदे आहेत. यामध्ये महिलांना वाहन चालवण्याची परवानगी नव्हती. मात्र, आता परवानगी देण्यात आली आहे. किंग सलमान यांनी दिलेल्या आदेशानुसार, यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यास सांगितली आहे. तसेच, ही समिती तीस दिवसांच्या आत सूचना सादर करेल. त्यानंतर जून 2018 मध्ये शरिया कायद्यानुसार महिलांना वाहन चालविण्यास परवानगी देण्याच्या आदेशाला मंजूरी देण्यात येईल.
सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात ट्विटरवर घोषणा केली आहे. यामध्ये सौदीतील महिलांना वाहन चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. महिलांना गाडी चालविण्यासाठी घातलेले निर्बंध म्हणजे एक सामजिक मुद्दा असल्याचे म्हटले जात आहे. कारण, धर्मात आणि कायद्यांमध्ये अशाप्रकारच्या निर्बंधांचा उल्लेख नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या मुद्यावर सरकार, मीडिया आणि समाजामध्ये चर्चा सुरु आहे. तसेच, महिलांना गाडी चालविण्यास बंदी घातल्यामुळे जगभरातून सौदी सरकारला टीकेला सामोरे जावे लागल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, किंग सलमान यांच्या या निर्णयाचे अमेरिकेने स्वागत केले आहे. सौदीतील महिलांना गाडी चालविण्यास परवानगी दिल्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा निर्णय देशाला योग्य दिशेला घेऊन जाणारा आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका प्रवक्त्याने म्हटले आहे.