इस्रायल आणि हमास यांच्यात तुंबळ युद्ध सुरू आहे. इस्रायल गाझा पट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांवर जबरदस्त बॉम्बिंग आणि रॉकेट हल्ले करत आहे. यातच आता, सौदी अरेबियाने गेल्या आठवड्यात इराणचे समर्थन असलेल्या हूती ग्रुपकडून इस्रायलवर डागले गेलेले किमान एक मिसाइल पाडल्याचे वृत्त आहे. वॉल स्ट्रिट जर्नलने आपल्या एका वृत्तात हा खुलासा केला आहे.
आतापर्यंत, केवळ अमेरिकेनेच इतर चार मिसाइल पाडल्याची माहिती समोर आली होती. या कारवाईत सौदी अरेबियाचा वाटा असल्याची कल्पना कुणालाही नव्हती. हे मिसाइल्स इस्रायलच्या दिशेने जात होती, असे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन आणि सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यात मंगळवारी (24 ऑक्टोबर) फोनवरून इस्रायल-हमास युद्धासंदर्भात चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांनी हे युद्ध मध्य आशियाच्या इतर भागांत पसरण्यापासून रोखण्यासंदर्भात चर्चा केल्याचे व्हाइट हाऊसने म्हटले आहे. या दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर, सौदी अरेबियाने हुतीचे मिसाइल पाडल्याचा खुलासा झाला आहे.
व्हाइट हाऊसच्या निवेदनानुसार, बायडेन आणि सौदी क्राउन प्रिंस यांच्यात 'संपूर्ण भागात स्थिरता कायम ठेवण्यासंदर्भात आणि संघर्ष वाढण्यापासून कशा पद्धतीने रोखता येईल' यासंदर्भात व्यापक चर्चा झाली. या शिवाय, हमासने गाझामध्ये बंदी बनवलेल्या बंदिवानांची तत्काळ सुटका करावी, असे आवाहनही या दोन्ही नेत्यांनी केले आहे.