इस्लामाबाद : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या संघटनेवर घालण्यात आलेली बंदी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने हटविली आहे. त्यामुळे त्याची संघटना पुन्हा कार्यान्वित होणार आहे. पाकिस्तामधील सुप्रीम कोर्टाने हाफिज सईदच्या 'जमात-उद-दावा' या संघटनेवरील बंदी हटविली असून या संघटनेमार्फत देशात सामजिक कार्य करण्याची परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधिशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. यामध्ये न्यायाधीश मंजूर अहमद आणि न्यायाधीश सरदार तारिक मसूद यांचा समावेश होता.
हाफीज सईद याच्या संघटनेचे पाकिस्तानात मोठे जाळे पसरले आहे. या संघटनेच्यामार्फत 300 मदरसे आणि शाळा, हॉस्पिटल, पब्लिशिंग हाऊस आणि अॅम्ब्युलन्स सेवा चालविली जाते. या संघटनेत जवळपास 50000 सदस्य आहेत. मात्र, या संघटनेकडून दहशतवादी कारवाया करण्यात येत असल्याचे उघडकीस आले होते. यानंतर पाकिस्तान सरकारकडून या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले होते. अमेरिकेने दहशतवाद्यांवर ड्रोनने हल्ला करण्याची तयारी सुरू केली होती. तसेच, पाकिस्तानची आर्थिक मदत थांबविण्याचीही अमेरिकेने तयारी सुरू केल्याचा दावाही 'रॉयटर्स' या वृत्तपत्र एजन्सीने केला होता. त्यामुळे पाकिस्ताने दशतवाद्यांबाबात कठोर भूमिका घेत असल्याचे दाखवत हाफिज सईदच्या संघटनेवर बंदी घातली होती.