युक्रेनमधील शाळेवर बॉम्बहल्ला; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, हायपरसॉनिकचा पुन्हा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 05:50 AM2022-03-21T05:50:49+5:302022-03-21T05:51:29+5:30
रशियाने शेकडाे नागरिकांनी आश्रय घेतलेल्या मारियुपाेल शहरातील एका शाळेवर भीषण बाॅम्ब हल्ले केले आहेत.
माॅस्काे/कीव्ह : रशियाने युक्रेनवर पुन्हा एकदा हायपरसाॅनिक क्षेपणास्त्राचा वापर केला असून, युक्रेनच्या इंधनसाठ्याला लक्ष्य केले, तर शेकडाे नागरिकांनी आश्रय घेतलेल्या मारियुपाेल शहरातील एका शाळेवर भीषण बाॅम्ब हल्ले केले आहेत. त्यात माेठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
रशियाने यापूर्वी मारियुपाेलमध्ये एका थिएटरवर बाॅम्बहल्ले करून सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केले हाेते. आता पुन्हा एका शाळेच्या इमारतीवर हल्ला करण्यात आला आहे. या इमारतीत ४००हून अधिक जण थांबले हाेते. दाेन्ही हल्ल्यांमध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शाळेची इमारत उद्ध्वस्त झाली असून, ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेल्याची भीती आहे.
युक्रेनचा सर्वात माेठा पाेलाद कारखाना उद्ध्वस्त
रशियाच्या निशाण्यावर सध्या मारियुपाेल शहर आहे. या शहरातील युक्रेनचा सर्वात माेठा ॲझाेव्स्टल पाेलाद कारखाना रशियाने उद्ध्वस्त केला आहे. त्यामुळे युक्रेनचे खूप माेठे आर्थिक नुकसान झाले आहे.
इंधनसाठा नष्ट
रशियाने किन्झाॅल क्षेपणास्त्राचा पुन्हा एकदा वापर करून काळ्या समुद्राच्या किनारपट्टीवर असलेल्या काेस्तियनतिनिव्कामधील युक्रेनचा माेठ्या प्रमाणावर इंधनसाठा नष्ट केला.