श्रीलंका सध्या खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशाकडे पेपर खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळेच श्रीलंकेने लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यापुढे परीक्षा कधी होतील याबाबत देखील माहिती दिलेली नाही. प्रिंटिंग पेपर संपुष्टात आल्याने आणि नवीन पेपरच्या आयातीसाठी निधी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला, असं अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितलं. तसेच पेपरची कमतरता असल्याने परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचं म्हटलं आहे.
सध्या श्रीलंका 1948 मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून श्रीलंकेत अन्नाची देखील टंचाई निर्माण झाली आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून एका आठवड्यात नियोजित चाचणी परीक्षा, पेपरच्या तीव्र तुटवड्यामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शाळेतील मुख्याध्यापक मुलांची चाचणी परीक्षा घेऊ शकत नाहीत, कारण प्रिंटिंगसाठी लागणारा कागद आणि शाई आयात करण्यासाठी निधी नाही असं पश्चिम प्रांताच्या शिक्षण विभागाने सांगितले.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की या निर्णयामुळे देशातील 45 लाख विद्यार्थ्यांपैकी सुमारे दोन तृतीयांश विद्यार्थ्यांच्या परीक्षेला फटका बसणार आहे. अत्यावश्यक आयातीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी परकीय चलनाच्या साठ्याच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत अन्न, इंधन आणि औषधांची कमतरता जाणवू लागली आहे. श्रीलंका सध्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेत महागाईचा आगडोंब पाहायला आहे. तेथील लोकांसाठी सोन्यापेक्षा दूध घेणं अधिक कठीण झालं आहे.
श्रीलंकेत सोन्यापेक्षाही दूध झालं महाग, एक पॅकेट ब्रेड घेणंही परवडेना, परिस्थिती भीषण
जीवनावश्यक वस्तू, औषधं आणि इंधनासहित अनेक गोष्टी श्रीलंका परदेशातून आयात करू शकत नाही. श्रीलंकेत घरगुती गॅस सिलिंडरचा देखील मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.क ज्यामुळे एक हजार बेकऱ्या या बंद पडल्य़ा आहेत. आठवडाभरपूर्वी इंडस्ट्री असोसिएशनने याबाबत माहिती दिली होती. देशामध्ये इंधनाची कमतरता असल्याने काही ठिकाणी विजेवर चालणारी यंत्रणा बंद करावी लागली आहे. दिवसभरात तब्बल सात तास वीजपुरवठा हा खंडीत केला जातो. गॅसच्या तुटवड्याचा परिणाम हा अनेक छोट्या रेस्टॉरंट्सवर होत आहे. पण सर्वसामान्य माणसांवर देखील गंभीर परिणाम होत आहे.