कराची : पाकिस्तानातील कराची शहरात एका मंदिरात शाळा भरते. या शाळेत शिकणाऱ्या हिंदू मुलांना शिक्षित करण्याचा विडा एका मुस्लिम महिलेने उचलला आहे. या शिक्षिकेचे नाव आहे अनम आगा. या शिक्षिका शाळेत येताच ही मुले त्यांचे ‘जय श्रीराम’म्हणून स्वागत करतात.शहरातील बस्ती गुरु भागात अनम एका मंदिरात ही शाळा चालवितात. हिंदू वस्ती असलेल्या भागात ही शाळा आहे. या भागात ८० ते ९० हिंदू कुटुंबे राहतात. अनम यांनी प्रतिकूल परिस्थितीत या मुलांना शिक्षित करण्याचा विडा उचलला आहे. शाळेत येताच अनम स्मितहास्य करत या मुलांना म्हणतात, ‘सलाम.’ आणि ही मुलेही प्रत्युत्तरात म्हणतात, ‘जय श्रीराम.’अनम यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही मंदिरातील शाळेबाबत लोकांना सांगतो तेव्हा लोकही आश्चर्यचकीत होतात. मात्र, आमच्याकडे शाळा चालविण्यासाठी दुसरी जागा नाही. आपले येथे येणे आजूबाजूच्या मुस्लिम कुटुंबांना पसंत नाही. मात्र, मी हे काम करते. कारण, या लोकांना आपल्या मूलभूत अधिकारांबाबत माहिती नाही. ही मुले शिक्षण घेऊ इच्छितात. यातील काही मुले जवळच्या शाळेतही शिकायला गेले. पण, त्यांना तिथे सामाजिक आणि धार्मिक समस्या आल्या. अनम म्हणतात की, मी कधीच धर्मावर बोलत नाही. कुणाच्याही भावना दुखावल्या जातील असे बोलत नाही. मी विविध विषयांवर त्यांचे लक्ष केंद्रीत करते. धर्म यात कुठेच येत नाही.
कराचीच्या मंदिरात भरते हिंदू मुलांची शाळा; वस्तीत राहतात केवळ ८० कुटुंबे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 3:19 AM