लंडन : ब्रिटनमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रयोगाचा एक भाग म्हणून सोडलेले टेडी बेअर अंतराळात एक लाख फूट उंचीपर्यंत जाऊन सुमारे साडेचार तासांनी पुन्हा जमिनीवर आले!केंट परगण्यातील बोले हिल येथील किंग्ज रोचेस्टर प्रिपरेटरी स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘रोफ्फा’ नावाचे हे टेडी बेअर हेलियम भरलेल्या फुग्याला बांधून सोडले होते. या शाळेतील माजी विद्यार्थी स्वत:ला ‘ओल्ड रोफेन्शियन्स’ असे म्हणवून घेतात. त्याच आधारे त्यांनी या टेडी बेअरचे नाव ‘रोफ्फा दी बेअर’ असे ठेवले होते.हे टेडी बेअर ‘स्ट्रॅटोस्फियर’ या पृथ्वीच्या वातावरणाच्या दुसऱ्या पातळीपर्यंत पोहोचले. साडेचार तास हवेत राहून २८ किमीचा प्रवास केला. अतिउंचीवरील विरळ हवेमुळे अखेरीस फुग्याचा स्फोट झाला व ते गुरुत्वाकर्षणाने पुन्हा जमिनीवर आले.‘मेट्रो.को. युके’ने दिलेल्या वृत्तानुसार ८ ते १३ या वयोगटातील विद्यार्थ्यांनी अवकाशाचा अभ्यास करण्याच्या प्रयोगाचा एक भाग म्हणून ‘आॅपरेशन कॉस्मिक डस्ट’ नावाच्या एका प्रोजेक्ट अंतर्गत हे टेडी बेअर फुग्याला बांधून सोडले होते. कॉम्प्युटिंग विषयाचे शिक्षक जॉन जोन्स आणि विज्ञान विषयाचे शिक्षक मॅग्नस केथनेस यांनी यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी ‘रोफ्फा’च्या अंतराळ सफरीचे चित्रीकरण करण्यासाठी ‘गो प्रो’ कॅमेरा सोबत जोडला होता. या कॅमेऱ्याने क्षितिजरेषा ओलांडून थेम्स नदी उत्तर समुद्राला जेथे जाऊन मिळते त्या थेम्स एक्स्युअरी प्रदेशाचे, छोट्याशा व्हीट बेटाचे, इंग्लिश खाडीचे आणि त्यापलीकडील फ्रान्समधीलही प्रदेशाचे चित्रीकरण केले.- हेलियमचा फुगा फुटल्यावर त्यास बांधलेले ‘रोफ्फा’ इंग्लंडमधील टॉनब्रिजजवळ हॅडलॉ येथे खाली जमिनीवर आले. मॅग्नस केथनस यांनी सांगितले की, ‘रोफ्फा’ एका घराच्या बगिच्यात पडले.त्या घराचे मालक असलेले दाम्पत्य संध्याकाळच्या वेळी बगिच्यात विरंगुळ्यासाठी बसले असताना त्यांना आकाशातून काही तरी विचित्र वस्तू खाली पडताना दिसली. ती कुठे पडली याचा त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना ‘रोफ्फा’ आढळले.‘रोफ्फा’ ज्याला कोणाला सापडेल त्याला उद्देशून लिहिलेला एक संदेश त्याच्या अंगावर चिकटविलेला होता. तो वाचून त्यात दिलेल्या नंबरवर त्या दाम्पत्याने आम्हाला फोन केला.केथनस म्हणाले की,जीपीएस यंत्रणेच्या साह्याने आम्ही ‘रोफ्फा’च्या प्रवासाचा मागोवा घेतच होतो. त्या दाम्पत्याचा फोन आला तेव्हा आम्ही त्यांच्या घरापासून जेमतेम एक मैल अंतरावर होतो. लगेच तेथे जाऊन आम्ही अंतराळसफर करून आलेल्या ‘रोफ्फा’ला ताब्यात घेतले.
शालेय विद्यार्थ्यांनी अंतराळात सोडले टेडी बेअर !
By admin | Published: June 13, 2017 4:54 AM