लंडन: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. गेल्याच आठवड्यात ओमायक्रॉननं भारतात शिरकाव केला. २ डिसेंबरला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. सध्याच्या घडीला देशात ओमायक्रॉनचे २३ रुग्ण आहेत. त्यातले १० जण महाराष्ट्रातील आहेत. त्यातच आता ओमायक्रॉननं चिंतेत आणखी भर घातली आहे.
शास्त्रज्ञांना ओमायक्रॉन व्हेरिएंटचं 'स्टील्थ व्हर्जन' सापडलं आहे. त्यामुळे व्हेरिएंट कोरोना चाचणीत आढळून येणं अवघड झालं आहे. सध्या वापरात असलेल्या चाचण्यांमधून ओमायक्रॉनचं स्टील्थ व्हर्जनची ओळख पटणं अवघड जात आहे. त्यामुळे आधीच चिंता वाढवणारा ओमायक्रॉन सर्वांची डोकेदुखी आणखी वाढवणार आहे.
ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी ओमायक्रॉनचं 'स्टील्थ व्हर्जन' शोधून काढलं आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटप्रमाणेच या व्हर्जनचं अनेकदा म्युटेशन झालं आहे. पण त्यात ठराविक जेनेटिक बदल झाल्याचं प्रमाण कमी आहे. त्याला शास्त्रीय भाषेत एस-जेन ड्रॉप आऊट म्हटलं जातं. त्यामुळेच पीसीआर चाचणीत कोरोना विषाणू ओळखता येतो आणि निदान करणं सोपं जातं.
ओमायक्रॉन व्हेरिएंटचं स्टील्थ व्हर्जन आरटी पीसीआर चाचणीत सहजासहजी आढळून येत नाही. ओमायक्रॉनचा हा नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामधील नमुन्यांमध्ये आढळून आला आहे. गिजएड जिनॉम डेटाबेसनं चाचणी केलेल्या एकूण ६ टक्के नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचं स्टील्थ व्हर्जन आढळून आल्याची माहिती युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन जेनेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक फ्रान्कोईस बॉलऑक्स यांनी दिली.