जगभरातील लोकसंख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. गरिबांना तर दोन वेळचं जेवण मिळणं देखील अवघड असतं. तर दुसरीकडे अन्नाची नासाडी होत असल्याची कित्येक उदाहरणं समोर येत आहेत. याच दरम्यान अशीच एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. संशोधकांनी आता अन्नधान्याच्या कमतरतेसंदर्भात एक धोक्याचा इशारा दिला आहे. येत्या 27 वर्षांमध्ये जगातील सर्व धान्य संपणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 24 एप्रिलपासून संशोधकांनी सजीवसृष्टीच्या मृत्यूच्या दिवसाची मोजणी सुरू केली आहे. पृथ्वीवासीयांकडे आता फक्त 27 वर्षं आणि 251 दिवस शिल्लक राहिले आहेत, असा संशोधकांनी दावा केला आहे.
सोशियोबायोलॉजिस्ट एडवर्ड विल्सन (Sociobiologist Edward Wilson) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीवरच्या माणसांची अन्नाची मागणी पूर्ण करायची असेल, तर आपल्याला आणखी दोन पृथ्वीसाऱख्या ग्रहांची गरज भासणार आहे. एडवर्ड विल्सन सांगतात, की पृथ्वीवर अन्नधान्य पिकवण्याची माणसाची एक मर्यादा आहे. जगातला प्रत्येक माणूस शाकाहारी बनला, तरी माणसाच्या गरजा भागवण्यासाठी जगातले शेतकरी आणि त्यांच्या जमिनी इतक्या मोठ्या प्रमाणात धान्यनिर्मिती करू शकणार नाहीत. पुढच्या काळात जगभरातली लोकसंख्या प्रचंड वाढणार आहे.
प्रत्येक माणसाची खाण्याची मागणी पूर्ण केली जाऊ शकणार नाही. पुढच्या 27 वर्षांमध्ये म्हणजेच 2050 मध्ये जगाची लोकसंख्या 10 अब्ज पोहोचणार आहे. अन्नधान्याच्या मागणीबाबत बोलायचं झाल्यास ही संख्या 2017 सालाच्या तुलनेत 70 टक्के वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी वाढती लोकसंख्या आणि अन्न-धान्य उत्पादनांच्या आकडेवारीवरून निष्कर्ष काढला आहे. तो असा, की गेल्या आठ हजार वर्षांमध्ये माणसाने कधीच केलं नसेल, इतक्या धान्याचं उत्पादन येणाऱ्या 40 वर्षांत माणसाला करावं लागणार आहे.
पृथ्वी एक हजार कोटी नागरिकांना अन्न खाऊ घालू शकेल. परंतु त्यानंतर धरतीवरचा भार वाढायला सुरुवात होणार आहे. माणसं आवश्यकतेपेक्षाही जास्त अन्न खात आहेत आणि नंतर अन्नाची नासाडीही करत आहेत. त्यामुळे धान्यनिर्मिती करण्यासाठी पृथ्वीवर दबाव वाढत जाणार आहे. पृथ्वीवरचे सर्व नागरिक शाकाहारी झाले, तरच जास्त लोकसंख्येला अन्न खाऊ घालता येणार आहे. उदाहरणार्थ, मक्याच्या तुलनेत मांसाचं उत्पादन करण्यास 75 हून अधिक पट ऊर्जेचा वापर केला जातो. 2050 पर्यंत जगातल्या सर्व देशांमध्ये अन्नधान्याची कमतरता भासणार आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.