कोरोना व्हायरसच्या साथीचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नसतानाच शास्त्रज्ञांनी एका नवीन व्हायरसचा इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की बर्फात झोम्बी व्हायरस गोठलेले होते पण ते आता पुन्हा समोर आले आहेत. त्यामुळे ते कोरोनापेक्षाही मोठी महामारी पसरवू शकतात. या व्हायरसशी संबंधित धोके अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, एका शास्त्रज्ञाने गेल्या वर्षी सायबेरियाई पर्माफ्रॉस्टमधून घेतलेल्या नमुन्यांमधून काहींचे पुनरुज्जीवन केलं.
गेल्या वर्षी, शास्त्रज्ञांनी काही झोम्बी व्हायरसना जिवंत करून त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि एका व्हायरसचा नमुना 48,500 वर्षे जुना असल्याचं आढळलं. या व्हायरसचा धोका ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामांशी संबंधित असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. समुद्रातील बर्फ नाहीसा होत आहे. यामुळे, हजारो वर्षांपासून बर्फात गोठलेले हे व्हायरस पुन्हा वाढू शकतात आणि जगासाठी विनाशकारी ठरू शकतात.
शास्त्रज्ञांच्या मते हे असे व्हायरस आहेत ज्यात माणसांना संक्रमित करण्याची आणि नवीन आजाराचा उद्रेक करण्याची क्षमता आहे. या व्हायरसमुळे वनस्पती, प्राणी आणि माणसांमध्ये धोकादायक रोग होऊ शकतात. जमिनीवरून हे व्हायरस पुन्हा बाहेर येणं लोकांसाठी खूप धोकादायक ठरू शकतं. या व्हायरससोबत नकळत इतरही अनेक छोटे व्हायरस जिवंत होऊ शकतात असा इशाराही देण्यात आला आहे.