जीनिव्हा : कोरोना संसर्गाचा झालेला फैलाव ही त्या साथीची एक मोठी लाट आहे. इन्फ्लूएंझाचा थंडीत जोर असतो पण उन्हाळ्यात त्याचा प्रभाव फारसा जाणवत नाही. मात्र ऋतूबदलाचा कोरोनाच्या संसर्गाच्या फैलावावर फारसा परिणाम झालेला नाही. उत्तर गोलार्धात उन्हाळ्यात कोरोना साथ मोठ्या प्रमाणावर पसरत आहे, असे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकारी मागार्रेट हॅरिस यांनी सांगितले, हाँगकाँगमध्ये कोरोना साथीच्या फैलावाचे प्रमाण वाढले असून, ती लाट आहे असे म्हणता येणार नाही. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविणे माणसाला सध्यातरी कठीण जात आहे. मात्र त्याच्या फैलावाचा वेग कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कृती करणे आवश्यक आहे.
त्या म्हणाल्या, जगात कोरोना विषाणूची सध्या पहिलीच लाट आली आहे. तिचे स्वरूप आणखी मोठे होणार आहे. या लाटेची तीव्रता कमी जास्त होत राहणार आहे. ऋतू बदलला की कोरोनाची साथ कमी होईल किंवा ती ओसरेल असे अनेक लोकांना वाटत आहे. मात्र हे लक्षात घेतले पाहिजे की, कोरोना हा नवीन विषाणू आहे. तो इतर विषाणूंपेक्षा वेगळे वर्तन करत आहे. अमेरिकेमध्ये उन्हाळ्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडली. अशा स्थितीत या साथीला रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली पाहिजे. सार्वजनिक कार्यक्रम घेण्यावर सध्या तरी बंदीघातली पाहिजे.कोरोना विषाणूचा फैलाव वाढू लागल्यावर उन्हाळ्यात यावर नियंत्रण येईल काय? यावर चर्चा रंगली होती. प्रत्यक्षात तसे काहीही झाले नव्हते.दक्षिण गोलार्धातही मोठा फैलावजागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकारी मागार्रेट हॅरिस यांनी सांगितले, कोरोना विषाणूच्या साथीची तीव्रता कोणत्याही ऋतूमध्ये सारखीच राहिल. दक्षिण गोलार्धात हिवाळ्याच्या मोसमातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेने बारिक लक्ष ठेवले आहे. या गोलार्धात श्वसनाशी संबंधित विकार असलेल्या रुग्णांत वाढ झाली तर त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडेल. दक्षिण गोलार्धातील लोकांनी फ्लूची लस टोचून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.