कीव्ह : युक्रेनमध्ये रविवारी मारियुपोल येथील दुसरा युद्धविरामदेखील अयशस्वी ठरला. त्या शहरात रशियाने हल्ले सुरू ठेवल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. युद्धाच्या अकराव्या दिवशी रशियाच्या लष्कराने खारकीव्ह व अन्य शहरांवरही आणखी जोरदार हल्ले चढवले. या माऱ्याच्या तीव्रतेमुळे युक्रेनमधील गॅस यंत्रणेची १६ गॅस पुरवठा केंद्रे बंद करण्यात आली. कनिव येथील जलविद्युत निर्मिती केंद्रावर कब्जा करण्यावर रशियाने आता लक्ष केंद्रित केले आहे.
अडकलेल्यांना काढण्यासाठी दोन्ही देशांनी मारियुपोल, वोल्नोवाखा या शहरांमध्ये शनिवारी काही तासांचा युद्धविराम घोषित केला मात्र, त्या कालावधीतही रशियाने हल्ले केल्याचा आरोप करून युक्रेनने नागरिकांना दुसऱ्या जागी नेण्याची मोहीम थांबवली होती. त्यानंतर रविवारी मारियुपोल येथे दुसऱ्यांदा लागू केलेला युद्धविराम अयशस्वी ठरला. मारियुपोल जिंकल्यास रशियाला युक्रेनवर अंकुश ठेवण्यास मोठा फायदा होणार आहे. खारकीव्ह, मायकोलेव्ह, चेर्निहिव, सुमी, खेरसन या भागांना दिलेला वेढा रशियाच्या लष्कराने आणखी घट्ट केला. काही झाले तरी रशियासमोर झुकणार नाही व मातृभूमीवर आम्ही पाय रोवून उभे राहू, असा निर्धार युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी व्यक्त केला. निवासी भागांतही रशिया बॉम्बहल्ले करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. (वृत्तसंस्था)
प्रतिकारामुळेच रशिया आक्रमकचेचेन्या व सीरियामध्ये याआधी झालेल्या युद्धात रशियन लष्कराला कडवा प्रतिकार झाला होता. त्यावेळी तिथेही रशियाने अनेक बॉम्बहल्ले केले होते. तशाच प्रकारची व्यूहरचना रशियाने युक्रेनबाबतही आखली आहे, असा ब्रिटनच्या तज्ज्ञांचा दावा आहे.
नाटोकडून युक्रेनला हवी मदतरशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनला लढाऊ विमाने तसेच विविध प्रकारची शस्त्रास्त्रे नाटो देशांनी पुरवावीत अशी मागणी हाेत आहे. नाटो देशांनी युक्रेनला आर्थिक व काही प्रमाणात शस्त्रास्त्रांची मदत करण्याचे ठरविले असले तरी ती पुरेशी नाही असे युक्रेनने म्हटले आहे. त्यामुळे नाटो देशांनी आणखी मदत केल्यास आमच्या देशाचे रक्षण होऊ शकेल, असा युक्रेनचा दावा आहे.
‘ऑपरेशन गंगा’ अंतिम टप्प्यात; १६ हजार भारतीय आले परत
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी राबविण्यात येत असलेले ‘ऑपरेशन गंगा’ अंतिम टप्प्यात पाेहाेचले आहे. युक्रेनमधून आतापर्यंत १५ हजार ९०० भारतीय परतले आहेत. साेमवारी ८ विमाने पाठविण्यात येणार असून, १,५०० भारतीयांना परत आणण्यात येणार आहे. रविवारी ११ विमानांमधून २,१३५ भारतीय परतले. साेमवारी ११ पैकी ५ विमाने हंगेरीच्या बुडापेस्ट येथून उड्डाण घेणार आहेत. ज्यांनी स्वत:ची राहण्याची साेय केली आहे, त्यांना बुडापेस्टमधील हंगेरिया सिटी सेंटर येथे पाेहाेचण्याची सूचना हंगेरीतील भारतीय दूतावासाने केली आहे. रविवारी पहाटे १८२ भारतीयांना घेऊन एक विमान मुंबईत उतरले, तर वायुसेनेच्या सी-१७ विमानातून २१० जण दिल्लीत दाखल झाले. याशिवाय आणखी एका खासगी कंपनीच्या विमानातून १८३ विद्यार्थी दिल्लीत परतले. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार २२ फेब्रुवारीला ‘ऑपरेशन गंगा’ सुरू झाल्यापासून १५ हजार ९०० भारतीयांना परत आणले आहे.