ऑनलाइन लोकमत
न्युयार्क, दि. १२ : जपानने अमेरिकेपुढे शरणागती पत्करल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. याच विजयाचा जल्लोष न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकात साजरा करताना एका नाविकाबरोबर चुंबन घेताना टिपलेल्या छायाचित्रामुळे जगप्रसिद्ध झालेल्या नर्सचे अमेरिकेत वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. प्रसिद्ध छायाचित्रकार आल्फ्रेड आयसेनस्टीट यांनी १४ ऑगस्ट १९४५ रोजी हा क्षण टिपला तेव्हा त्यातील नर्स ग्रेटा झिमर फ्रिडमन २१ वर्षांची होती. व्हर्जिनियातील रिचमंड येथील रुग्णालयात त्यांचे गुरुवारी निधन झाल्याची माहिती त्यांचे चिरंजीव जोशुआ फ्रिडमन यांनी दिली. आणि दुसऱ्या महायुद्धानंतरचा 'किस'आनंद काळाच्या पडदयाआड झाल्याचे समोर आले.
त्या दिवशी जपानने अमेरिकेपुढे शरणागती पत्करल्याची बातमी टाइम्स चौकातील फलकावर झळकली आणि आसपासची उपाहारगृहे, दुकाने, चित्रपटगृहे आदींतून बाहेर पडत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे विजयाचा जल्लोश व्यक्त केला. त्याच दरम्यान ग्रेटा फ्रिडमन यांना जॉर्ज मेंडोसा या नाविकाने आपल्या कवेत घेऊन आवेगाने एक रसरशीत चुंबन घेतले आणि हा क्षण आयसेनस्टीट यांच्या कॅमेऱ्यात कायमचा कैद झाले. हे छायाचित्र सर्वप्रथम LIFE नियतकालिकात छापून आले आणि लवकरच ते जगभरात प्रसिद्ध झाले. 'व्ही-जे डे इन टाइम्स स्क्वेअर' किंवा 'द किस' नावाने ओळखले गेलेले हे छायाचित्र विसाव्या शतकातील मोजक्या गाजलेल्या छायाचित्रांपैकी एक म्हणून गणले जाते.
या छायाचित्रावर आधारित द किसिंग सेलर: द मिस्टरी बिहाइंड द फोटो दॅट एंडेड वर्ल्ड वॉर टू या पुस्तकाचे सहलेखक लॉरेन्स व्हेरिया यांनी म्हटले आहे की, ग्रेटा यांचे आई-वडील नाझी जर्मनीत झालेल्या वंशविच्छेदात मारले गेले. पंधरा वर्षांच्या ग्रेटा यांनी ऑस्ट्रियातून पळ काढून अमेरिकेत आश्रय घेतला. तेथे युद्धकाळात त्या दंतवैद्यक साहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. हे छायाचित्र घेतले गेले तेव्हा त्या आणि जॉर्ज आयुष्यात प्रथमच एकमेकांसमोर येत होते. त्यांचा कसलाही परिचय नव्हता. वास्तविक जॉर्ज रिटा पेट्री नावाच्या दुसऱ्या एका परिचारिकेबरोबर डेटवर तेथे आले होते.
त्याच वेळी जपानच्या शरणागतीची बातमी फलकावर झळकली आणि त्यांनी उत्स्फूर्त आवेगाने ग्रेटा यांना मिठीत घेऊन चुंबन घेतले. काही छायाचित्रांत मागे पेट्रा स्मितहास्य करताना दिसतही आहेत.