लंडन : युरोपमध्ये कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला असून ब्रिटननेही येत्या गुरुवारपासून महिनाभरासाठी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रान्स, जर्मनीसह काही देशांनी याआधीच दुसऱ्यांदा कडक लॉकडाऊन अंमलात आणला आहे.ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांवर पोहोचली असून सध्या तिथे रोज २० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. युरोपमध्ये दुसऱ्या लाटेत ४४ देशांमध्ये गेल्या गुरुवारी २ लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडले होते. दुसऱ्या लाटेमुळे भीषण संकट ओढविण्याची चिन्हे दिसू लागल्याने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. ब्रिटनमध्ये कोरोना बळींची संख्या सध्या ४६ हजार आहे. ती दुसऱ्या लाटेत ८० हजार किंवा त्याहीपेक्षा अधिक होऊ शकते असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. ब्रिटनमध्ये लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, शाळा व विद्यापीठे सुरू राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता पब, रेस्टॉरंट व अन्य सर्व दुकाने बंद राहणार आहेत. (वृत्तसंस्था)ट्रम्प यांच्या सभांमुळे ३० हजार लोक बाधित?अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या १८ सभांमुळे साथीच्या फैलावास हातभार लागला. ३० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली असण्याची व त्यातील ७०० जणांचा बळी गेला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोरोनाची दुसरी लाट; ब्रिटनमध्ये महिनाभरासाठी पुन्हा लॉकडाउन; ४४ देशांंमध्ये २ लाखांहून अधिक नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2020 1:20 AM