फ्रँकफर्ट - जर्मनीमध्यो दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब सापलेल्या ठिकाणाजवळच्या सुमारे 18 हजार 500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. अखेरीस जर्मनीच्या बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने हा बॉम्ब निकामी केला. "दिलासादायक बातमी म्हणजे आम्ही यशस्वीरीत्या निकामी केला आहे. आता स्थानिक रहिवासी आपल्या घरी परतू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली." सुमारे 500 किलो वजनाचा हा बॉम्ब अमेरिकन फौजांनी येथे ठेवलेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, बॉम्ब सापडल्यानंतर येथील एक हजार मीटरच्या परिसरातील घरे खाली करून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर बॉम्ब निकामी करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी सुमारे एक तासाचा अवधी लागला. जर्मनी आणि फ्रान्समध्ये दुसऱ्या महायुद्घाच्या काळातील बॉम्ब आढळणे ही सामान्य बाब आहे. काही महिन्यांपूर्वीच फ्रान्समधील नॉमर्डी येथे सुमारे 220 किलोचा बॉम्ब सापडला होता. तसेच गतवर्षी फ्रँकफर्ट येथे 1.8 टन वजनाचा ब्रिटिशांनी ठेवलेला बॉम्ब आढळल्याने तेथील सुमारे 60 हजार रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.
जर्मनीत आढळला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब, 18 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 2:00 PM