ऑनलाइन लोकमत -
कराची, दि. ५ - पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात येण्याआधी पाकिस्तान सरकार सुरक्षेचा आढावा घेणार आहे. पाकिस्तान सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात भारतात तीन सदस्यीय सुरक्षा पथक पाठवणार आहे. पाकिस्तान संघ भारतात असताना व्यवस्थित सुरक्षाव्यवस्था पुरवली जाईल याची खात्री हे पथक करणार आहे. पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्री चौधरी निसार अली खान यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
8 मार्चपासून टी20 वर्ल्ड कप सुरु होत आहे. पाकिस्तान संघ कोलकाता, धरमशाला आणि मोहाली येथे खेळणार आहे. मात्र पाकिस्तान संघ भारतात येण्यावरुन अगोदरच विरोध होऊ लागला आहे. धरमशाला येथे होणा-या मॅचवरुन हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी सुरक्षा पुरवण्यास असमर्थ असल्यांचं केंद्राला सांगितलं आहे. मुंबईत शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे पाकिस्तानी आणि भारतीय अधिका-यांची नियोजीत बैठकही रद्द झाली होती. त्यामुळे पाकिस्तानने सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे.
पाकिस्तान तीन सदस्यीय सुरक्षा पथक भारतात पाठवणार आहे. सोमवारी हे पथक भारतासाठी रवाना होणार आहे. हे पथक सुरक्षेचा आढावा घेईल. जर अहवाल सकारात्मक असेल तरच पाकिस्तानी क्रिकेट संघ भारतात जाईल अशी माहिती पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्री चौधरी निसार अली खान यांनी दिली आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघ पुढील आठवड्यात भारतासाठी रवाना होणार आहे, मात्र परिस्थिती असमाधानकारक असेल तर उशीरदेखील होऊ शकतो असं चौधरी निसार अली खान यांनी सांगितलं आहे.