बीजिंग - दक्षिण चिनी समुद्रातील वादग्रस्त आयलंडनजीक अमेरिकेची युद्धनौका पाहून चीनच्या संतापाला पारावार उरला नाहीये. अमेरिकेनं चीनच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करावा, असं म्हणत अमेरिकेच्या या कृतीला चीननं विरोध दर्शवला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या नौदलाची क्षेपणास्त्र नाशक युद्धनौका चीन दावा सांगत असलेल्या द्विपाच्या जवळून गेली. या भागावरून चीनचा शेजारील देशांशी वाद सुरू आहे.चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, चीननं युद्धनौकेची ओळख पटवण्यासाठी स्वतःचं सैन्य जहाज तिथे पाठवलं आणि अमेरिकेच्या युद्धनौकेला तिथून जाण्याचा इशारा दिला. अमेरिकेच्या युद्धनौकेनं चीनचा कायदा व संबंधित आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं आहे. तसेच चीनचं सार्वभौमत्व व सुरक्षेच्या हितांचंही उल्लंघन केलं आहे. चीननं कडक शब्दात याचा निषेध नोंदवल्याचंही चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिकेच्या नौदलानं चौथ्यांदा केलेलं फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन ऑपरेशन(FNOP) आहे.परंतु अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून अद्यापही याबाबत कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यानं दिलेल्या मर्यादेतच अमेरिकेच्या युद्धनौका प्रवास करतात. आम्ही नियमित स्वरूपात FNOP करतोय, आम्ही पहिल्यापासून हे करत आलो आहोत. तसेच भविष्यातही करत राहू. अमेरिकेचं नौदल दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या दाव्याला आव्हान देण्यासाठी नियमितरीत्या असे ऑपरेशन करत असते. व्हिएतनाम, फिलिपिन्स, तायवानही या द्विपांवर दावा करतात. चीनचं सरकार स्वतःच्या सीमा व सार्वभौमत्वाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध असेल. अमेरिकेनंही आमच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करावा, असंही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. ट्रम्प हे उत्तर कोरियाशी दोन हात करण्यासाठी चीनवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. चीन उत्तर कोरियाचा महत्त्वाचा शेजारील देश असून, सर्वात मोठा भागीदार देशही आहे.
दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेची युद्धनौका पाहून संतापला चीन, सार्वभौमत्वाचा सन्मान करा, चीनचा अमेरिकेला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 6:57 PM