ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - सेल्फी म्हणजे आता प्रत्येकाच्या आयुष्याचा दैनंदिन भाग बनला आहे. आता सेल्फी काढणं चांगलं की वाईट याबद्दल कुणी ठाम असं सांगू शकत नाही. पण ही सेल्फी धोकादायक ठरु शकते एवढं मात्र नक्की. सेल्फी किती जीवघेणी आहे हे सांगण्यासाठी कोणा तज्ञाची, ज्योतिषाची गरज नाही. गुगलवर नुसतं सर्च जरी केलंत तरी सेल्फीमुळे किती जणांना आपला जीव गमवावा लागला याची माहिती तुम्हाला मिळेल. मुंबईत गुरुवारी मरिन ड्राईव्हवर आपल्या मित्रांसोबत गेलेल्या तरुणीचा सेल्फी काढण्याच्या नादात समुद्रात बुडून मृत्यू झाला, आणि पुन्हा एकदा जीवघेण्यास सेल्फीचा मुद्दा चर्चेत आला.
प्रीती पिसे (17) नावाची तरुणी आपल्या मित्रांसोबत तारापोरवाला मत्स्यालयासमोर समुद्राच्या कडेला बसला होती. यावेळी सेल्फी काढत असतान जोरात आलेली लाट तिला ओढून आत घेऊन गेली. तिच्या मित्राने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. तोपर्यत प्रीतीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तिचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे सेल्फी काढणं खरचं इतकं गरजेचं आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सेल्फी काढताना आपल्या जीवाची काळजी न घेणं किती धोकादायक असू शकतं हे अशा घटनांमधून सिद्ध होत असतानाही लोक मात्र जागृत होताना दिसत नाहीत.
सेल्फी काढल्यावर त्याला लगेचच सोशल मीडियावर अपलोड करणे. त्यानंतर त्याला मिळणारे लाईक्स आणि कमेंट्स याची तर चटकच लागली आहे. सेल्फीच्या या शर्यतीत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. जगभरातील अशाच काही खतरनाक 15 सेल्फी आपण पाहूयात....या सेल्फींमध्ये काहीजण एका उंच इमारतीवर, तर काहीजण जंगली प्राण्यासमोर उभे आहेत. काढलेला प्रत्येक सेल्फी धोकादायक आहे हे पाहिल्यावर कळेल.
सेल्फीमुळे सर्वात जास्त मृत्यू भारतात -
सेल्फी काढण्याच्या नादात होणा-या मृत्यूमुळे भारत पहिल्या क्रमांकावर आहे. 2016 पर्यंतच्या आकडेवारीनुसार दोन वर्षात जगभरात एकूण 127 जणांनी आपला जीव गमावला होता. यामधील 76 मृत्यू भारतातील होते. अनेकांचा मृत्यू सेल्फी काढत असताना ट्रेनने धडक दिल्याने तसंच उंचावरुन खाली पडून झाला होता
जनजागृतीसाठी सॅमसंगने गडकरींच्या मदतीने घेतला पुढाकार
सेल्फीमुळे होणारे अपघात, मृत्यू रोखण्यासाठी सॅमसंगने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाशी हातमिळवणी केली आहे. मोबाईलचा गैरवापर रोखावा हा यामगचा मुख्य उद्देश आहे. "सेफ इंडिया" नावाने त्यांनी कॅम्पेन सुरु केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं.