ऑनलाइन लोकमत -
चीन, दि. ९ - आयफोन विकत घेण्यासाठी आपल्या 18 दिवसाच्या मुलीला ऑनलाइन विकल्याची धक्कादायक घटना चीनमध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून त्याला 3 वर्षाच्या कारागृहवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर त्याला साथ देणा-या आईलाही अडीच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
फुजियान प्रांतातील ही घटना आहे. डुआन याने सोशल मिडिया QQ या साईटवर आपल्या मुलीला विकण्याची जाहीरात टाकली होती. त्याच साईटवर एकाने त्याच्याकडून (23 हजार युआन) 2 लाख 39 हजार रुपयांना या मुलीला विकतदेखील घेतले. फक्त आयफोन आणि दुचाकी विकत घेण्यासाठी त्याने हे दुष्कृत्य केले. या मुलीला विकत घेणा-यानेच पोलिसांकडे याबाबत तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला.
या पिडीत मुलीची आई जिआओ अनेक ठिकाणी पार्ट टाईम काम करते तर डुआन जास्तीत जास्त वेळ इंटरनेट कॅफेमध्येच घालवतो. दोघेही 19 वर्षाचे असताना या मुलीचा जन्म झाला. त्यांची इच्छा नसताना या मुलीचा जन्म झाला होता. मुलीचे आई-वडिल तिचा सांभाळ करण्याच्या स्थितीत नसल्याने मुलीला सध्या ज्यांनी विकत घेतले आहे त्यांच्याकडेच ठेवण्यात आले आहे. मुलीला विकल्यानंतर मुलीच्या आईने पळ काढला होता मात्र पोलिसांनी तिला अटक केली.
'मी स्वत: दत्तक घेतली गेली आहे. माझ्या शहरात अनेक लोक त्यांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी दुस-यांच्या घरी मुलांना पाठवतात. मला हे बेकायदेशीर आहे माहित नव्हत' असं स्पष्टीकरण तिने दिलं आहे.