वॉशिंग्टन : नासाने मानवाला मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर सुलभतेने आणि सुरक्षितरीत्या उतरविण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून सूचना मागवल्या आहेत. प्रचंड उष्णतेपासून यानाचे संरक्षण करण्याच्या या तंत्रज्ञानाचे इन्फ्लॅटेबेल स्पेसक्राफ्ट हिट शिल्ड्स किंवा हायपरसोनिक इन्फ्लॅटेबेल एअरोडायनामिक्स डिसीलेरेटर (एचआयएडी) असे तांत्रिक नाव आहे. नासा हे तंत्रज्ञान विकसित करीत असून त्यामुळे वजनाने हलक्या; परंतु मोठे वजन वाहून नेऊ शकणाऱ्या तबकड्या निर्माण करता येणार असून मानवी मंगळ मोहीम राबविणे शक्य होणार आहे. या तबकडीद्वारे मंगळाच्या पृष्ठभागावर २२ टनाहून अधिक सामग्री पाठविता येऊ शकेल, असे नासाच्या सूत्रांनी सांगितले. अंतराळवीरांसह मंगळावर उतरणाऱ्या यानाचे वजन १५ ते ३० टनादरम्यान असेल, असे नासाच्या हॅम्पटन, व्हर्जिनिया येथील लँग्ले संशोधन केंद्राचे स्टीव्ह गॅड्डीस यांनी सांगितले. नासाचे मार्स क्युरोसिटी हे यान लाल ग्रहावर उतरलेले आतापर्यंतचे सर्वात वजनदार यान असून त्याचे वजन एक टन आहे. प्रचंड वजन वाहून नेणाऱ्या वाहनाची गती मंगळाच्या विरळ वातावरणात कमी करून त्याला सुरक्षितरीत्या लाल ग्रहावर उतरविणे हे मुख्य आव्हान आहे. त्यामुळेच नासा मोठ्या तबकड्या विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे. या तबकड्या विरळ वातावरणात स्वत:चा वेग कमी करून मोठे वजन उतरवू शकतील, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
मानवी मंगळ मोहिमेसाठी कल्पना पाठवा
By admin | Published: September 21, 2015 11:17 PM