दमास्कस : सिरियाची राजधानी दमास्कच्या दक्षिणेला एका शिया धर्मस्थळाजवळ तसेच मध्य सिरियात होम्स शहरातील बॉम्बस्फोटात कमीत कमी ८७ जण ठार आणि अन्य कित्येक जण जखमी झाले. सिरियात संघर्षरत गटात शस्त्रसंधी व्हावी म्हणून प्रयत्न सुरू असतानाच या घटना घडल्या आहेत.ब्रिटनस्थित ‘सिरियन आॅब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईटस्’ या मानवाधिकार संघटनेतर्फे तसेच सरकारी वृत्त वाहिनीने ही माहिती दिली. मृतांत सामान्य नागरिकांचा समावेश आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. या बॉम्बस्फोटांचे फुटेज टी.व्ही.वरून दाखविण्यात आले. त्यात हवेत उंचच धूर आणि आगीचे लोळ दिसून आले. अग्निशामक दलाचे कर्मचारी स्फोटामुळे निर्माण झालेले ढिगारे दूर करण्याचा प्रयत्न करीत असताना दिसून आले. अन्य बचाव पथकांतील कर्मचारी जखमींना स्ट्रेचरवरून इस्पितळात नेताना दिसले. टीव्हीवरील हे चित्रीकरण पाहता बॉम्बस्फोटामुळे मोठी क्षती पोहोचली असल्याचे स्पष्ट दिसते. स्फोटामुळे आसपासच्या दुकानांना आग लागली आणि अनेक मोटारी उद्ध्वस्त झाल्या. या शहरात अलीकडील काळातील भीषण हल्ला आहे. (वृत्तसंस्था)असद याची इच्छाआपल्याला इतिहासाने सिरिया वाचविणारा व्यक्ती म्हणून ओळखावे, अशी आपली इच्छा असल्याचे सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनी व्यक्त केली आहे. एका स्पॅनिश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, अध्यक्ष म्हणून पुढील १० वर्षे मी सिरियाचा बचाव करू शकलो, तर सिरियाला वाचविणारा नेता म्हणून इतिहासात माझी नोंद व्हावी. याचा अर्थ मी पुढील १० वर्षे सिरियाचा अध्यक्ष राहणार असा नाही. केवळ १० वर्षांसाठी मी माझा दृष्टिकोन सांगत आहे.