युक्रेनला शस्त्रास्त्रे दिल्यास गंभीर परिणाम; रशियाचा अमेरिका, नाटो देशांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 07:02 AM2022-04-17T07:02:48+5:302022-04-17T07:03:24+5:30

यासंदर्भात एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका युक्रेनला लष्करी हेलिकॉप्टर, हॉवित्झर तोफा, अत्याधुनिक लष्करी वाहने अशी विविध प्रकारची ६१ अब्ज रुपयांची संरक्षण सामग्री देणार आहे.

Serious consequences if arms are given to Ukraine Russia warns US, NATO | युक्रेनला शस्त्रास्त्रे दिल्यास गंभीर परिणाम; रशियाचा अमेरिका, नाटो देशांना इशारा

युक्रेनला शस्त्रास्त्रे दिल्यास गंभीर परिणाम; रशियाचा अमेरिका, नाटो देशांना इशारा

Next

कीव्ह :  युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व इतर लष्करी साधनांचा अमेरिका, नाटो देशांनी पुरवठा केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा रशियाने दिला आहे. ही शस्त्रास्त्रे पुरवून हे देश आगीत आणखी तेल ओतत आहेत, असाही आरोप रशियाने केला. 

यासंदर्भात एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका युक्रेनला लष्करी हेलिकॉप्टर, हॉवित्झर तोफा, अत्याधुनिक लष्करी वाहने अशी विविध प्रकारची ६१ अब्ज रुपयांची संरक्षण सामग्री देणार आहे. त्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याच आठवड्यात केली होती. त्यानंतर काही दिवसांनी रशियाने याबाबत अमेरिका व नाटो देशांना इशारा दिला. 

अमेरिकी सरकारने म्हटले आहे की, युक्रेनला पाश्चिमात्य देश मोठ्या प्रमाणावर संरक्षण सामग्रीचा पुरवठा करत आहेत. त्याचा युक्रेनच्या लष्कराकडून प्रभावी वापर सुरू आहे. रशियाने युक्रेनमध्ये नरसंहार घडवला आहे. पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला मिळणारी मदत पाहून रशिया संतापला असून, भविष्यात तो अधिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यताआहे. 

रशियाने युक्रेनमधील डोनबास प्रांताला आता लक्ष्य केले असून, तेथे सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव केली आहे. त्या हल्ल्यांना रोखण्यासाठी युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा उपयोग होईल. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की व जो बायडेन यांच्यात अतिरिक्त लष्करी मदतीसंदर्भात चर्चा झाली होती. 

कीव्हमध्ये आतापर्यंत ९०० जण ठार
रशियाने कीव्ह परिसरात केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ९००हून अधिक जण ठार झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. त्यांचे मृतदेह रेल्वे स्थानक, इमारतींची तळघरे अशा अनेक ठिकाणी सापडले. त्यातील बहुतांश लोकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. काळ्या समुद्रातील रशियन नौदलाची मोस्कवा युद्धनौका युक्रेनच्या लष्कराने क्षेपणास्त्रांचा मारा करून बुडवली. तो रशियासाठी मोठा धक्का होता. त्यानंतर रशियाने पुन्हा कीव्हवर जोरदार हल्ले करण्याची घोषणा केली आहे. 

रशियाच्या तेल निर्यातीवर बंदी घाला -
रशियावर घातलेले निर्बंध वेदनादायी असले तरी शांतता प्रस्थापित करण्यासाठी ते पुरेसे नाहीत. त्याच्या तेल निर्यातीवर जगातील सर्व लोकशाही देशांनी संपूर्ण बंदी घातली पाहिजे. त्यामुळे रशियाची कोंडी होऊन युद्ध थांबू शकेल, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाच्या तेलावर याआधीच बंदी लागू केली आहे.  युरोपमधील अनेक देशांना रशिया तेलाचा पुरवठा करतो. भारताने रशियाकडून तेल घेऊ नये, यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. 

खारकीव्हमध्ये दहा ठार -
खारकीव्ह शहरामध्ये रशियाने शनिवारी केलेल्या माऱ्यात १० जणांचा मृत्यू झाला. त्यात सात महिन्यांचा एक मुलगाही आहे. कीव्हमध्ये रशियाच्या हल्ल्यात युक्रेन लष्कराच्या एका दारुगोळा कारखान्याचे मोठे नुकसान झाले. 

बोरिस जॉन्सन यांना रशियाची प्रवेशबंदी -
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन व त्यांच्या मंत्रिमंडळातील भारतवंशीय मंत्री ऋषी सुनक, प्रीती पटेल आदी मंत्र्यांना रशियाने प्रवेशबंदी केली आहे. युक्रेन युद्धामुळे ब्रिटनने रशियावर काही निर्बंध लादले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने हा निर्णय घेतला आहे. रशियाने सांगितले की, ब्रिटनच्या ॲटर्नी जनरल सुएला ब्रेव्हमन, उपपंतप्रधान डोमिनिक राब, परराष्ट्र मंत्री लिझ ट्रूस, संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनाही रशियात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 

या यादीत नजीकच्या काळात ब्रिटनमधील आणखी काही राजकीय नेते तसेच खासदार यांच्या नावांची भर पडणार आहे असे सूचक विधानही रशियाने केले. युक्रेन युद्धामुळे रशियाच्या सर्वोच्च नेत्यांवर निर्बंध लादण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला. 


 

Web Title: Serious consequences if arms are given to Ukraine Russia warns US, NATO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.