जेरुसलेम : इस्रायलने प्रत्युत्तराचा छोटासा प्रयत्न केला तरी त्याचे परिणाम फार गंभीर होतील, असा इशारा इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे. त्यानंतर आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रत्युत्तर द्यायचे की नाही किंवा कसे द्यायचे याचा निर्णय इस्रायल घेईल, अशी भूमिका घेऊन संभ्रम कायम ठेवला आहे. त्यांनी मित्र राष्ट्रांकडून संयम राखण्याचे आवाहनही धुडकावून लावले. इस्रायलने यापूर्वी इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर गाझामध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
इस्रायलच्या मित्र राष्ट्रांनी इस्रायलला या हल्ल्याला प्रत्युत्तर टाळण्याचे आवाहन केले आहे. शनिवार व रविवारचा हल्ला मर्यादित होता आणि जर इराणला मोठा हल्ला करायचा असेल तर झायोनिस्ट राजवटीचे काहीही शिल्लक राहणार नाही, असा इशारा इराणने दिला आहे.
जहाजातील भारतीय महिलेची सुटकाओमानच्या आखातात इराणने जप्त केलेल्या जहाजातून सुटलेली भारतीय डेक कॅडेट ॲन टेसा जोसेफ ही भारतात परतली आहे. गुरुवारी ॲन टेसा जोसेफ केरळमधील कोचीन विमानतळावर उतरल्या. त्यांचे येथे प्रादेशिक पासपोर्ट अधिकाऱ्यांनी स्वागत केले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जोसेफ भारतात परतल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, भारतीय दूतावासाने मोठे काम केले आहे. जोसेफ घरी पोहोचल्याचा आनंद झाला. देशात असो वा परदेशात सर्वत्र मोदींची गॅरंटी चालते.
संघर्षाचा फटका विमान प्रवाशांना- इस्रायल, हमास आणि इराण यांच्यातील संघर्षाचा फटका आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीला बसला आहे. भारतातून युरोपात जाणारी विमाने संघर्षग्रस्त भाग वगळून पर्यायी मार्गांनी जात आहेत. प्रवासी भाड्यांत व मालवाहतूक दरातही वाढ झाली आहे. - नवी दिल्ली आणि मुंबई येथून लंडन, फ्रँकफर्ट, पॅरिस, न्यूयॉर्क आदी शहरांना जाणाऱ्या विमानांना हवेत १५ ते ४५ मिनिटे अतिरिक्त लागत आहेत. त्याचा भुर्दंड प्रवाशांना बसत आहे. सागरी वाहतूकही धोक्याची आली आहे.
इस्रायलने मदतीवर बंदी घातल्याचा आरोप- पॅलेस्टिनी निर्वासितांना मदत करणाऱ्या संयुक्त राष्ट्र मदत आणि कृती संस्थेचे (यूएनआरडब्ल्यूए) प्रमुख फिलीप लाझारी यांनी इस्रायलवर गाझा आणि पश्चिमी समुद्रकिनाऱ्यावर नागरी मदत देण्यावर बंदी घातल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांना दिली आहे. - युद्ध सुरू झाल्यापासून या संस्थेचे १७८ कर्मचारी मारले गेले आहेत. संस्थेच्या १६० पेक्षा जास्त मदत शिबिरांत बहुतांश पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला होता, पण तेही उद्ध्वस्त करण्यात आले असून तेेथे ४०० जणांचा बळी गेला आहे.
कतार म्हणतो, मध्यस्थीवरच विचार करण्याची वेळ- कतारच्या पंतप्रधानांनी सांगितले की, देश इस्रायल आणि हमास यांच्यातील मध्यस्थ म्हणून भूमिकेचा फेरविचार करत आहे. गाझामधील संपूर्ण युद्धात कतार हा प्रमुख मध्यस्थ राहिला आहे. कतारमुळेच डझनभर ओलिसांची सुटका झाली. - संकुचित राजकीय स्वार्थासाठी कतारच्या मध्यस्थीचा दुरुपयोग झाला आहे, अशी निराशा कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुररहमान अल थानी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे नाव न घेता व्यक्त केली आहे.