नाटो सदस्यत्व घेतल्यास गंभीर परिणाम; फिनलंडला रशियाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 07:03 AM2022-05-14T07:03:32+5:302022-05-14T07:03:48+5:30

स्वीडन रविवारी जाहीर करणार भूमिका

Serious consequences if NATO membership; Russia warns Finland | नाटो सदस्यत्व घेतल्यास गंभीर परिणाम; फिनलंडला रशियाचा इशारा

नाटो सदस्यत्व घेतल्यास गंभीर परिणाम; फिनलंडला रशियाचा इशारा

Next

माॅस्को : नाटो संघटनेचे सदस्यत्व मिळविण्यासाठी  उत्तर युरोपातील देशांनी (नॉर्डिक देशांनी) अर्ज करण्याच्या विचारास फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष साउली निनित्सो यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, असे प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम फिनलंडला भोगावे लागतील, असा इशारा रशियाने दिला आहे. 

सोव्हिएत रशियाला शह देण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी नाटो संघटनेची स्थापना केली होती. युक्रेनवर आक्रमण करणारा रशिया भविष्यात आपल्यावरही हल्ला चढवू शकतो, अशी भीती पोलंड, फिनलंड आदी देशांच्या मनात आहे. त्यामुळेच फिनलंडने नाटोच्या सदस्यत्वासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. स्वीडन हा देश देखील यासंदर्भात काही दिवसांत निर्णय घेईल. मात्र या देशांनी असे पाऊल उचलल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा रशियाने दिला आहे. स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन या नाटो सदस्यत्व घेण्याबाबतची आपली भूमिका रविवारी जाहीर करतील, असे सांगण्यात आले. रशियाच्या दडपशाहीच्या भूमिकेला युरोपमधील अनेक देश कंटाळले आहेत. त्यामध्ये पोलंड, फिनलंड, स्वीडन आदींचा समावेश आहे. 

युक्रेनच्या एका नागरिकाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या रशियाच्या सैनिकावर दाखल केलेल्या खटल्याचे कामकाज शुक्रवारपासून कीव्हमधील न्यायालयात सुरू झाले. युद्ध गुन्हेगारीसंदर्भात युक्रेनने रशियाच्या सैनिकांवर केलेली ही पहिलीच कारवाई आहे. 

मारियुपोलवर हल्ले सुरूच
युक्रेनमध्ये मारियुपोल शहराचा अद्यापही कब्जात न आलेला भाग लवकरात लवकर जिंकून घेण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. त्यामुळे शुक्रवारीही त्या शहरावर रशियाने बॉम्बहल्ले केले, तर रशियाने ताब्यात घेतलेली काही गावे, शहरे युक्रेनने पुन्हा जिंकून घेतली आहेत. 

Web Title: Serious consequences if NATO membership; Russia warns Finland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.