Russia-Ukraine Conflict: अणुयुद्ध झाल्यास १० कोटी लोकांचा मृत्यू? रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी दिला गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 06:28 AM2022-03-03T06:28:08+5:302022-03-03T06:28:55+5:30
Russia-Ukraine Conflict: युक्रेनच्या युद्धामुळे रशिया व पाश्चिमात्य देशांत प्रचंड तणाव वाढला आहे.
मॉस्को : तिसरे महायुद्ध झाल्यास ते अणुयुद्ध असेल. त्यात महाभयंकर विनाश होईल अशी धमकी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव्ह यांनी अमेरिका व पाश्चिमात्य राष्ट्रांचे नाव न घेता त्यांना दिली आहे. युक्रेनच्या युद्धामुळे रशिया व पाश्चिमात्य देशांत प्रचंड तणाव वाढला आहे.
रशिया व अमेरिकेमध्ये अणुयुद्ध झाल्यास व दोन्ही देशांनी ५०० अणुबॉम्बचा वापर केल्यास अवघ्या अर्ध्या तासात सुमारे १० कोटी लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. अणुबाॅम्बमुळे होणारा किरणोत्सार तसेच प्रचंड नुकसानीमुळे जग सुमारे १८ हजार वर्षे मागे जाईल. अणुयुद्धामुळे जगातील हवामानाची स्थितीही बदलण्याचा धोका संभवतो. एखाद्या शहरात १ किमीच्या परिसरात १ लाखांपेक्षा अधिक लोक राहात असतील, तर अशा ठिकाणी अणुबॉम्बमुळे प्रचंड विध्वंस होऊ शकतो.
रशियाविरोधात लादलेल्या निर्बंधांशिवाय तिसरे महायुद्ध हा देखील पर्याय असेल असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले होते. त्याचा संदर्भ देऊन लावरोव्ह म्हणाले की, तिसरे महायुद्ध हे अणुयुद्ध आहे हे सर्वांनीच नीट लक्षात ठेवावे. रशियाविरुद्ध लादलेल्या निर्बंधांचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र रशियाचे खेळाडू, पत्रकार यांच्यावर पाश्चिमात्य देशांनी बंधने लादणे अयोग्य आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लावरोव्ह म्हणाले की, युक्रेनने अण्वस्त्रे मिळवू नयेत याच कारणासाठी रशियाने त्या देशावर आक्रमण केले. रशियाने म्हटले आहे की, युक्रेनशी चर्चेची दुसरी फेरी आम्ही तयार आहोत, मात्र अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या युक्रेनने अतिशय ताठर भूमिका घेतली आहे. (वृत्तसंस्था)
आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये आजारामुळे मृत्यू
- भारतीय विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये मेंदूच्या पक्षघाताने मृत्यूपंजाब येथील बर्नालाचा मूळ रहिवासी असलेल्या चंदन जिंदाल या विद्यार्थ्याचे मेंदूच्या पक्षाघाताने बुधवारी निधन झाले. २ फेब्रुवारीला चंदनला मेंदूचा पक्षाघात व हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तो कोमामध्ये होता.
- ४ फेब्रुवारी रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण त्याच्या स्थितीमध्ये फारसा फरक पडला नव्हता. त्याच्या देखभालीसाठी त्याचे वडील व आणखी एक नातेवाईक युक्रेनला गेले होते.
- चंदन जिंदालचा मृतदेह युक्रेनमधून भारतात अंत्यसंस्कारासाठी नेण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी अशी मागणी त्याच्या पालकांनी केली आहे. रशियन सैनिकाच्या हल्ल्यात बुधवारी नवीन ज्ञानगौदरचा मृत्यू झाला होता.
प्रत्येक गोष्टीसाठी लांबलचक रांगा
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मेट्रो स्टेशन, विमानतळ सगळीकडेच लांबलचक रांगा लागल्या आहेत. कसेही करून आम्हाला गावी पोहोचण्याची आस लागल्याचे या विद्यार्थ्यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
२ अब्ज लोकांवर येईल उपासमारीचे संकट
जगातील एकूण अण्वस्त्रांपैकी एक टक्का अण्वस्त्रांचा जरी वापर झाला तरी सुमारे २ अब्ज लोकांची अवस्था अतिशय बिकट होऊ शकते. अन्नधान्याच्या टंचाईअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. अणुयुद्ध झाल्यास पृथ्वीवरील वातावरण इतके धूसर होईल की, या ग्रहाच्या १० टक्के भागावर सूर्यप्रकाशच पोहोचू शकणार नाही.
व्हिक्टर यानुकोविच युक्रेनचे भावी राष्ट्राध्यक्ष?
युक्रेनमधील युद्ध जिंकल्यास सध्याचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांना हटवून त्या पदावर व्हिक्टर यानुकोविच यांना विराजमान करण्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मनात आहे. युक्रेनचे मूळ नागरिक असलेले व्हिक्टर यानुकोविच हे २०१४ साली रशियामध्ये पळून गेले होते. व्हिक्टर हे पुतीन यांच्या मर्जीतले आहेत. २०१० साली युक्रेनचे चौथे राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हिक्टर यानुकोविच यांची निवड झाली होती. त्यांच्या सरकारविरोधात २०१४ साली जनतेनेच बंड केले. व्हिक्टर यांच्या विरोधातील निदर्शनांना २०१३ सालापासूनच सुरुवात झाली होती. त्यानंतर असंतोष वाढत गेला होता.
रशियाच्या विमानांना अमेरिकेची बंदी अमेरिकेने रशियाच्या विमानांना आपली हवाई हद्द बंद केली आहे. तसेच युक्रेनमध्ये अमेरिका सैन्य पाठविणार नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासारख्या हुकूमशहाला आपल्या गैरकृत्यांची किंमत चुकवावी लागेल. - जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष अमेरिका
भारतीयांसाठी सर्वतोपरी प्रयत्न
युक्रेनमधून सर्व भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. विशेष अडचणी न येता युक्रेनमधील भारतीयांना परत आणले जात आहे. या कामी भारतीय लष्कर, हवाई दलही मदत करत आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान