पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ( serum institute of india) आणि युनिसेफ (UNICEF) यांच्यात कोव्हीशील्ड व नोवाव्हॅक्सच्या पुरवठ्यासाठी मोठा करार झाला आहे. या करारानुसार सीरमकडून येत्या काळात जगातील १०० देशांना ११० कोटी कोरोना लशीचे डोस पुरवले जाणार आहेत. या माध्यमातून भारत देश कोरोना लसीच्या निर्मितीतील एक महत्वाचा देश म्हणून ओळखला जाणार आहे. याशिवाय अनेक देशांनी कोरोना लस खरेदी करण्यासाठी भारताशी संपर्क देखील साधला आहे.
ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनकाच्या संयुक्त विद्यमातून विकसीत करण्यात आलेल्या कोव्हीशील्ड लसीचे उप्तादन करण्याचा कारार सीरम इन्स्टिट्यूटशी झालेला आहे. तर नोव्हॅक्स या लशीच्या उप्तादनासाठी सीरमचा अमेरिकास्थित नोव्हॅक्स इंक कंपनशी झालेला आहे. युनिसेफचे कार्यकारी अधिकारी हेनरीटा फोर यांनी सीरमसोबत झालेल्या कराराची माहिती जाहीर केली आहे.
पॅन अमेरिका हेल्थ ऑर्गनायझेशनसह ( PAHO) इतर अनेक संघटनांशी मिळून एकूण १०० देशांसोबत ११० कोटी लसीच्या डोसची ऑर्डर देण्यात आली आहे, असं हेनरीटा फोर यांनी सांगितलं. ही लस ३ अमेरिकन डॉलरमध्ये अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांमध्ये लस पुरवठा करण्यासाठी सीरमसोबत काम करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असं युनिसेफनं म्हटलं आहे. अल्प उत्पन्न गटापर्यंत कोरोना लस पोहोचविण्यासाठी याआधीच कोव्हॅक्स मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. याचं नेतृत्व संयुक्त राष्ट्र संघ करत आहे. या मोहिमेअंतर्गत जगातील १४५ देशांमधील मजूर आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना स्वस्त दरात कोरोना लस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी कोरोना लस बनविणाऱ्या अनेक कंपन्यांसोबत करार करण्यात आला आहे.