रशियाची चंद्र मोहिम चंद्रावर सपशेल आपटली आहे. लुना २५ चे थ्रस्टर सुरु करताना समस्या आली आणि क्रॅश लँडिंगमध्ये लुना चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळले. यामुळे रशियालाच नाही तर अवघ्या जगावर वक्रदृष्टी ठेवून असलेल्या चीनला देखील जबर दणका बसला आहे.
रशियाच्या चंद्र मोहिमेसाठी चीनदेखील खूप उत्सुक होता. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर रशियाची ही पहिली चंद्रमोहीम होती. हा रशियाचा धक्का होताच, परंतू चीनसाठी देखील होता. आता चिनी मीडिया लुना-२५ ची एकही बातमी चालविण्यास तयार नाहीय.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची रशियासोबत चंद्रावर तळ बनवण्याची इच्छा होती. प्रस्तावित तळाच्या बांधकामामुळे चीनला अमेरिकेसह इतर अवकाश महासत्तांना आव्हान द्यायचे होते. Luna-25 च्या संदर्भात, रशियन आणि चिनी अंतराळ संस्थांनी 2021 मध्ये घोषणा केलेली. या महिन्याच्या सुरुवातीला रशियन आणि चिनी शिष्टमंडळांची रशियाच्या वास्तोचन कॉस्मोड्रोम येथे भेट झाली होती. चीनच्या अंतराळ संशोधन प्रकल्पाचे मुख्य डिझायनर वू यानहुआ यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली होती.
परंतू, लुना मिशन फेल झाल्यावर लगेचच चीनची भूमिका बदलली आहे. या अपयशामुळे रशियाच्या महत्त्वाकांक्षेला धक्का बसणार आहे, असे कम्युनिस्ट नेते हू झिजिन यांनी एका वृत्तपत्रात लिहिले आहे. तर आता आपल्याला सर्वकाही पुन्हा शिकावे लागेल. आत्मविश्वासाने चंद्रावर कसे उड्डाण करायचे ते शिकले पाहिजे. आत्मविश्वासाने कसे उतरायचे ते शिकले पाहिजे. पुन्हा एकदा सर्वकाही शिकूनच चीनसह इतर देशांसोबत प्रकल्प सुरू केले पाहिजेत, असे अंतराळ इतिहासकार अलेक्झांडर झेलेझ्नायाकोव्ह यांनी एका रशियन मीडियाला सांगितले.
अंतराळ भागीदार म्हणून रशियाचे महत्त्व खूपच मर्यादित असल्याचा समज आता चीनचा होऊ लागला आहे. रशिया काही देऊ शकत नाही, असे चीनला वाटू लागले आहे. चंद्र मोहिमेसाठी चीनच्या संसाधनांचा अधिक चांगला वापर करण्यासाठी रशियाने चीनी मोहिमांसह भागीदारी केल्याचा समज आता चीनचा होऊ लागला आहे. यामुळे त्यांचा चंद्रावर बेस तयार करण्याचा मनसुबा डळमळीत होऊ लागल्याचे अंतराळ धोरण संशोधक पावेल लुझिन यांनी म्हटले आहे.