Pakistan Elections, Imran Khan vs Nawaz Sharif: फोडाफोडीचे राजकारण हे कोणत्याही देशाला नवीन नाही. भारताचा शेजारील देश असलेल्या पाकिस्तानात नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीच्या निकालानंतर आता घोडेबाजार तेजीत असून, इम्रान खान यांच्या पक्षातील नेतेमंडळींना फोडण्याचा प्रयत्न नवाझ यांच्या पक्षाकडून सुरु आहे. निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला गती आली आहे. अशातच इम्रान खान यांच्या पक्षातील पहिली 'विकेट' पडल्याचे समजते आहे. इम्रान यांच्या पक्षाच्या सर्वच नेतेमंडळींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यामुळे तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) लाहोर नॅशनल असेंब्लीच्या NA-121 जागेवरून विजयी झालेले आझाद उमेदवार वसीम कादीर यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझमध्ये प्रवेश केला आहे.
मतमोजणी सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवाझ शरीफ यांनी इतर पक्षांना आणि उमेदवारांना सरकार स्थापनेसाठी आपल्यासोबत येण्याचे निमंत्रण दिले होते. आता नवाझ शरीफ यांनी वसीम कादिरच्या रूपाने इम्रान खान यांची पहिली विकेट काढली. पीएमएल-एन (PML-N) ने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये वसीम कादिर मरियम नवाज आणि पीएमएल-एन नेते सोबत दिसले. व्हिडिओमध्ये वसीम कादिर म्हणाले, “मी वसीम कादिर, माजी पीटीआय सरचिटणीस लाहोर, स्वगृही (पक्षात) परतलो आहे. माझ्या परिसराच्या आणि परिसरातील लोकांच्या विकासासाठी मी पुन्हा मुस्लिम लीग-एनमध्ये सामील झालो आहे.” कादिर हे पीटीआय सोडणारे पहिले पीटीआय समर्थित उमेदवार ठरले आहेत.
कादिर यांनी संपूर्ण निवडणूक प्रचारात इम्रान खान यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगून त्यांच्या नावाने लोकांकडून मते मागितली होती. त्यांनी त्यांच्या अनेक सभांमध्ये इम्रान खान यांच्याचबाबतच्या गोष्टी सांगितल्या होत्या. 'मी इम्रान खान यांचा उमेदवार आहे. त्यांच्यावरील अन्याय पाहता मतदारांमध्ये निराशा आहे. अपक्ष उमेदवार पलटी मारू शकतात, असा इशारा पीटीआयने निवडणुकीपूर्वी दिला असला, तरी ते पक्ष सोडणार नाहीत, अशी आशाही त्यांनी आपल्या उमेदवारांकडून व्यक्त केली होती. पण आता त्यांनीच नवाझ यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानात सध्या स्थिती काय?
इम्रान खान यांच्या PTI ने पाठिंबा दिलेल्या ९३ उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवली. निवडणुकीत नवाझ शरीफ यांचा पक्ष जवळपास ७९ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नसले तरी निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष आहे. निवडणुकीतील तिसरा पक्ष पीपीपीकडेही ५४ जागा आहेत. निवडणूक निकालानंतर PTI आणि PML-N दोन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला असून, त्यानंतर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. येत्या काही दिवसांत जेव्हा सभागृह बोलावले जाईल तेव्हा पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला नॅशनल असेंब्लीच्या १६९ जागांचे बहुमत सिद्ध करावे लागेल. दोन पक्षांनी एकत्र येऊनच 'मॅजिक फिगर' गाठता येऊ शकणार आहे.