बीजिंग - चीनमधील ह्युबेई येथे कार घुसवून 7 जणांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून सहा ते सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चालकाला रोखण्यासाठी गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात कार चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ह्युबेई प्रांतातील झाओयांग शहरात भरधाव वेगाने एक कार अचानक गर्दीत घुसली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार चालकाला रोखण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे चालकाच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात चालकाचा मृत्यू झाला आहे. कारमधून काही सामान जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरुन मुद्दाम ही घटना घडवून आणल्याचे स्पष्ट होत आहे.
चीनमध्ये गुरुवारी (22 मार्च) एका केमिकल प्लांटमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत जवळपास 44 लोकांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केमिकल प्लांटमध्ये झालेल्या स्फोटानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.