ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 4 - सात मुस्लिम देशातील नागरीकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयावरुन अखेर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. वॉशिंग्टनमधील न्यायालयाने ट्रम्प यांच्या आदेशाची अंमलबजावणी करु नये असा निर्णय दिला. न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया आणि मासाच्युसेटस येथील न्यायालयानेही असाच निकाल दिला होता. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाला आपल्या निर्णयावरुन माघार घ्यावी लागली आहे.
या निर्णयामुळे इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया व येमेन या मुस्लीम देशातील नागरीकांचा अमेरिकेत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ट्रम्प यांच्या आदेशामुळे या देशातील नागरीकांना ९० दिवस प्रवेश बंदी लागू झाली होती. ज्यांच्याकडे वैध अमेरिकी व्हिसा आहे व ग्रीन कार्ड आहेत त्यांनाही याचा फटका बसला होता.
वैध कागदपत्रे असणा-यांना आता प्रवेश मिळणार आहे. ट्रम्प यांना हा निर्णय पचनी पडलेला नसून त्यांनी टि्वट करुन न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली. आपण हा निर्णय लवकरच बदलू असे त्यांनी सांगितले.